Kolhapur News : कधी कारवाई मागे घेण्यासाठी, तर कधी लाच घेण्यासाठी वर्दीतली खाकी मलीन होत आहे. अशातच पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात याच खाकी वर्दीतील एका सरकारी कर्मचाऱ्याने बनावट नोटा छापण्याचा उद्योग केल्याचे उघड झाले आहे. बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाइंड असणारा पोलिस कॉन्स्टेबलचा सुगावा लागताच सांगली पोलिसांनी कारवाई केली आहे.
500, 200 रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून 99 लाख 29 हजार 300 रुपयांचे मुल्यांच्या बनावट नोटांसह इतर साहित्य असा एक कोटी ११ लाख सहा हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे बनावट नोटा बनविणाऱ्या या टोळीचा मास्टरमाईंड इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत आहे, अशी माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
टोळीतील एक संशयित सुप्रित देसाई बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने मिरजेत आला होता. येथील महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद करत 42 हजार रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याच्याकडील तपासात कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली. यात बनावट नोटा तयार करण्याचे काम संशयित राहुल जाधव करत होता; तर संशयित सुप्रीतसह मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे बनावट नोटा विविध भागांत वितरित करण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत जाधवचा शोध घेतला. तेव्हा तो कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत मशीनद्वारे तो हुबेहुब बनावट नोटांची छपाई करत असल्याचे समोर आले. त्यानंतर राहुल जाधवला ताब्यात घेतले.
या प्रकरणी इब्रार आदम इनामदार (४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काडाप्पा देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिध्देश जगदीश म्हात्रे (३८, रा. रिध्द गार्डन, ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) या संशयितांना अटक केल्याची माहिती घुगे यांनी दिली.
इब्रार २००६ मध्ये पोलिस भरती झाला. मोटार विभागाचे प्रशिक्षण घेऊन तो पोलिस दलात रुजू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो बनावट नोटा छपाईच्या टोळीत सामील झाला. नोटा खपविण्यासाठी गेलेला इब्रार आठवड्याभरापासून रजेवरच होता.
मिरजेत सापडलेल्या बनावट नोटांची छपाई शहरातील रूईकर कॉलनीमधील ‘सिद्धलक्ष्मी’ अमृततुल्य चहा दुकानात झाल्याचे तपासात उघड झाले. जिल्हा पोलिस दलाच्या मोटार वाहन विभागात कार्यरत इब्रार आदम इनामदार मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. मागील आठवडाभरापासून इब्रार रजेवर गेला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन वर्षांपूर्वी त्याने चहा दुकानासाठी घेतलेल्या दुकानगाळ्यात छापा टाकून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या ६८ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत ‘सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा’ नावाच्या दुकानातच नोटांची छपाई झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथे छापा टाकून पाचशे रुपयांच्या ६८ बनावट नोटा, प्रिंटर, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करत दुकान सील केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.