
Solapur, 14 April : बार्शी तालुक्याची सर्वसाधारण आमसभा तब्बल नऊ तास चालली. या आमसभेत तब्बल चार वर्षांपासून प्रशासक या नात्याने कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर नागरिक अक्षरशः तुटून पडले. मनमानी कारभार, सावळा गोंधळ, निकृष्ट कामे यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तावडीत सापडलेल्या अधिकाऱ्यांवर तक्रारींचा भडीमार केला. बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या गुटखा विक्रीसह अवैध धंद्यावरूनही नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याच वेळी काही नागरिकांनी गुटख्यांच्या पुड्या उधळत पोलिस प्रशासनाचा निषेध केला.
बार्शीची (Barshi) आमसभा सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झाली. ती रात्री आठपर्यंत चालली. तब्बल नऊ तास ही आमसभा चालली. आमसभेत रस्त्यांची कामे आणि त्यांचा दर्जा, अवैध धंदे, त्यातही अवैध गुटखा विक्रीवरून नगारिक आक्रमक होते. पहिल्या तासापासूनच नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण आमसभेत चांगलीच खडाखडी रंगली होती.
बार्शीच्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) होते. खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, गणेश जाधव, नागेश अक्कलकोटे, मकरंद निंबाळकर, निरंजन भूमकर, तहसीलदार एफ. आर. शेख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षांपासून सरकारच्या सर्व विभागाचा कारभार हा प्रशासकाच्या नात्याने अधिकाऱ्यांच्या हातात आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नगारिकांकडून कडक ताशेरे ओढण्यात आले.
प्रशासकीय विभागातील सावळा गोंधळ, मनमानी कारभार, निकृष्ठ कामे, पैसे घेऊन होणारी कामे यांसह पाणीपुरवठा, वीज, दुय्यम निबंधक, रस्त्यांची निकृष्ट कामे, बंदी असताना बार्शी तालुक्यात राजरोजसपणे होणारह गुटखा विक्री यांसह अनेक प्रश्नांवर आमसभेत नागरिकांनी आमदार, खासदार यांच्यासमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हतबल झालेल्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता-देता नाकीनऊ आले होते.
कोट्यवधी रुपये खर्चूनही बंधाऱ्यांची कामे निकृष्ठ दर्जा झाली आहेत, त्या बंधाऱ्यांना दरवाजेही नाहीत, त्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडत नाही. बंधाऱ्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत, दगड आणि मुरमाची चोरी, ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांना पैसे मागितले जात आहेत.
शेतकऱ्यांना २०२२ पासून वीज जोडणी मिळालेली नाही, रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. बार्शीचा शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, बार्शी शहरातील अवैध धंदे, विशेषतः बंदी असतानाही होणारी गुटखा विक्री आदी मुद्यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
याच वेळी काही नागरिकांनी गुटख्या पुड्या सभेत उधळून पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून अधिकाऱ्यांवर होणारी प्रश्नांची सरबत्ती पाहून खासदार-आमदारही अवाक झाले होते.
कोणाच्याही चुकांवर पांघरून घालू नका : सोपल
आमदार दिलीप सोपल यांनीही अधिकाऱ्यांना सुनावले. चुकांवर पांघरून घालू नका आणि कोणालाही सांभाळून घेऊ नका. झालेल्या कामाचा दर्जा तपासूनच बिले काढावीत. निकृष्ट कामांची बिले काढून सरकारचा पैसे वाया घालवू नका.
कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर शेतकऱ्यांनी ती बंद पाडावीत. कोणी दबाव आणात असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. तुमच्या सर्व अडचणी संबंधित मंत्र्यांपुढे मांडल्या जातील. जे अधिकारी नियमानुसार कामे करत नसतील तर त्यांची उचलबांगडी निश्चितपणे करण्यात येईल, असा इशाराही सोपल यांनी दिला.
त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : ओमराजे निंबाळकर
वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. त्याचे डिपॉझिट जप्त करावे. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही राजकीय दबावाखाली येऊन काम करू नये. कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले की आम्हाला कळवा.
त्यांना पैसे देऊ; पण पावडर लावून देऊ. कोणीही लोकप्रतिनिधींना बदनाम करू नये. नागरिकांच्या तक्रारी समजल्या असून अधिकाऱ्यांनी त्याचा लेखी अहवाल द्यावा; अन्यथा वेळ आल्यास जनतेसाठी मी आणि आमदार दिलीप सोपल मिळून रस्त्यावर उतरू, असा इशाराही खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.