सोलापूर : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लाटेत राज्यात २०१४ मध्ये शिवसेना (Shivsena)-भाजपची (BJP) सत्ता आली. पाच वर्षे काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीला (NCP) सत्तेपासून दूर राहावे लागले. मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे पडझड झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेची उभारी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सत्ता जाताच काँग्रेसमधील वरिष्ठ नेतेमंडळी, मंत्री आपापल्या मतदारसंघात छोटे-मोठे प्रश्न सोडवत आहेत.
दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना प्रदेश कार्याध्यक्षपद मिळाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. पण, त्या ‘शहर मध्य’ सोडून कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे ‘डिस्टर्ब’ झालेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पक्षांतरापासून रोखणारा ‘वाली’ कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Praniti Shinde did not solve Solapur despite being given a state-level position)
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरसह राज्याच्या व देशाच्या राजकारणात जवळपास १९७३ पासून सक्रिय राहिले. करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिंदे १९७४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून शिंदे यांनी २०१४ पर्यंत मागे वळून पाहिलेच नाही. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ॲड. शरद बनसोडे यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शिंदे यांचा पहिला पराभव केला. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. त्यामुळे शिंदे यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आता प्रणिती शिंदे याच जिल्ह्याच्या नेत्या असतील, असेही स्पष्ट केले.
शिवसेना, भाजप, एमआयएम या राजकीय पक्षासह काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या नेत्यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मोदीच्या २०१४ च्या लाटेतही त्या विजयी झाल्या, याच मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली. पण, आता पक्षातील काही नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात गेल्याने त्यांना पुढील निवडणुकीत विजयाचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी फुलटाईम ‘शहर मध्य’ विधानसभा मतदारंघात व सोलापूर शहरावरच फोकस केला आहे. जिल्ह्यासाठी त्या वेळ देत नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे.
अनेक पदाधिकारी निष्क्रीय
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार असतानाही नेत्यांकडे विशेषत: मंत्र्यांकडे निधीची मागणी केली. पण, पुरेसा निधी मिळाला नसल्याची नाराजी आहे. आता अनेक पदाधिकारी राजकारणात सक्रिय नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पक्षाला उभारी मिळावी; म्हणून जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष द्यायला हवे. मात्र, सोलापूर महापालिका आणि ‘शहर मध्य’ विधानसभा एवढ्यापुरत्याच त्या सध्या सिमित असल्याचे चित्र आहे.
धवलसिंहांसाख्या जिल्हाध्यक्ष होऊनही पक्षाला मरगळ
काँग्रेसने डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. त्यावेळी त्यांनी जिल्हाभर दौरे केले, काँग्रेस भवनात त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. अनेक पदाधिकाऱ्यांनी राज्यात सत्ता असल्याने त्यांच्याकडे निधीसाठीची निवेदने दिली. त्यासाठी त्यांनी सकारमधील मंत्री, माजी मंत्र्यांसह पक्षातील आमदार, वरिष्ठ नेत्यांना वेळ मागितला आणि जिल्ह्यातील दौऱ्याचे नियोजन केले. पण, त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तेही सध्या शांतच आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.