
Solapur, 05 January : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आघाडीतील दोन पक्षांनी एकाच मतदारसंघातून दोन-दोन उमेदवार उतरवले होते. तसेच, अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच उमेदवार घोषित केले होते. तोच प्रकार आपल्याबाबत घडल्याचा किस्सा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी शनिवारी सांगितला. खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून दुसऱ्याची शिफारस केली, त्यामुळे माझी अडचण आणि मला मतदारसंघ बदलावा लागला, अशी खंत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ सोडावा लागल्याची खंत व्यक्त केली. या वेळी आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार शहाध्यक्ष सुधीर खरटमल, प्रवक्ते यू. एन. बेरिया, माजी अध्यक्ष भारत जाधव आणि पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
अभिजीत पाटील म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढ्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दुसऱ्याची शिफारस केली. त्यामुळेच माझी मोठी अडचण झाली, त्यानंतर मला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ सोडून माढा मतदारसंघात जावं लागलं. पण, माढ्यातूनही मी विधानसभेची निवडणूक जिंकली.
दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याचे आश्वासन या तीनही आमदारांनी यांनी दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही जिल्ह्यातील तीनही नूतन आमदारांनी या वेळी दिली.
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे असतील, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची कामे कर. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील महापालिका निवडणूक असो अथवा शहरातील कोणत्याही प्रश्नासाठी आम्हाला हाक द्यावी, त्यावेळी आम्ही हजर राहू, असे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी शब्द दिला. तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.