

Praniti Shinde Protest Solapur: पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात सापडलेल्या सोलापुरातील शेतकऱ्यांना आता वीज भारनियमनाचा फटका बसत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी (7 सप्टेंबर) सोलापुरात आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी करपलेल्या सोयाबीनची रोपे हातात घेत शेतकऱ्यांची व्यथा प्रशासनासमोर मांडली. ग्रामीण भागातील लोडशेडिंग तातडीने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, सूर्यफूल आणि उडीद यांसारखी पिके अडचणीत आली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्ध असतानाही लोडशेडिंगमुळे विद्युत पंप सुरू करता येत नसल्याने उभी पिके जळून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रणिती शिंदे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील माने यांच्या दालनात शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आले.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. राज्याचे ऊर्जा खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असताना सोलापूरच्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्पष्टपणे सांगावे, अशी टीका त्यांनी केली. महावितरणकडून ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तातडीने थांबवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही प्रणिती शिंदे यांनी बोचरी टीका केली. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्या म्हणाल्या, 'राज्यातील ऊर्जा खाते त्यांच्याकडे नाही. त्यांच्या अखत्यारित हा विषय येत नाही. पण, सोलापुरातील शेतकऱ्यांकडे लक्ष देणे पालकमंत्र्यांचे काम आहे. मात्र, त्यांचे लक्ष दुसरीकडेच आहे,' असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला.
पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान होत असताना त्यातच लोडशेडिंगची भर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आंदोलनामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.