Solapur Loksabha Election 2024 : वडिलांचा ढासळलेला बुरूज लेक सावरणार? प्रणिती शिंदे लोकसभेसाठी सज्ज

Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे यांनी दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत
Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता प्रणिती शिंदेच लढतील, असे जाहीर करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय जीवनातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. शिंदे यांनी यापूर्वीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर कले होते. मात्र, ते पुन्हा रिंगणात उतरले होते. लोकसभेच्या गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये शिंदे पराभूत झाले आहेत. त्यामुळे या वेळी ते पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता धूसर आहे. प्रणिती यांचा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी जणू अत्यंत सुरक्षित असे घरच आहे. मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी 'एमआयएम'च्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणात मते घेऊनही प्रणिती विजयी झाल्या होत्या. आता प्रणिती शिंदे लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तर विधानसभा कोण लढवणार यावरून या सुरक्षित घरात रस्सीखेच सुरू होणार आहे.

न्यायालयातील शिरस्तेदाराची नोकरी करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. खडतर परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद, विविध मंत्रिपदे आणि केंद्रातही महत्वाची मंत्रिपदे भूषवली. काही काळ ते राज्यपाल पदावरही होते. एकेकाळी सोलापूर शहरावर त्यांची एकहाती सत्ता होती. शिरस्तेदाराची नोकरी दहा वर्षे केल्यानंतर त्यांना कारकून म्हणून बढती मिळाली. बीएची पदवी मिळवल्यानंतर 1965 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते लाॅ करण्यासाठी पुण्यात आले. त्यावेळी त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. पुढे ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. दरम्यान, शरद पवार यांच्याशी त्यांची ओळख वाढत गेली, त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यातूनच नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले. 1972 मध्ये करमाळा (जि. सोलापूर) मतदारसंघातून त्यांची निवडणूक लढवण्याची संधी थोडक्यात हुकली.

Praniti Shinde
Girish Mahajan Called Manoj Jarange : गिरीश महाजन स्पष्टच बोलले, मराठा समाजाने सरकारला आणखी वेळ द्यावा!

हायकमांडच्या अत्यंत जवळचे नेते

त्या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मिक निधन झाले. पोटनिवडणुकीत शिंदे विजयी झाले आणि 23 एप्रिल 1973 रोजी पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. उत्तरोत्तर त्यांचा राजकीय उत्कर्ष होत गेला. 2014 च्या मोदी लाटेत मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीतही त्यांचा पु्न्हा पराभव झाला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरले होते. आंबेडकर यांनी घेतलेली मते शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती. दोनदा पराभूत झाले तरी शिंदे यांचे पक्षातील महत्त्व कमी झालेले नाही. हायकमांडच्या ते अत्यंत जवळचे समजले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाला होता. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दोघेही इच्छुक होते. यावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीत पक्षश्रेष्ठींनी सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश केला होता.

गटबाजीला पक्षश्रेष्ठी कंटाळले

गेली दहा वर्षे सोलापूरला नेतृत्व आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यात मधला काही काळ वगळता 2014 पासून महापालिका आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. खासदार भाजपचे, शहरातील तीनपैकी दोन आमदार भाजपचे, तरीही अनेक विकासकामे रखडली. नवे प्रकल्प आले नाहीत. समस्या सुटता सुटल्या नाहीत. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजीचे सोलापूरकरांना वेळोवेळी दर्शन झाले आहे. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अडकून पडलेले आहेत. सोलापूरच्या समस्यांसाठी केंद्रातील संबंधित मंत्र्यांना निवेदन दिल्याचे, मागण्या केल्याचे फोटो आणि प्रेसनोट माध्यमांकडे पाठवणे, एवढेच त्यांचे काम आहे की काय, अशी शंका निर्माण होते. भाजपमधील या गटबाजीला पक्षश्रेष्ठीही कंटाळून गेले आहेत. शहराचा कायापालट करण्याची संधी भाजप नेत्यांनी गटबाजीमुळे घालवली, अशी सर्वसामान्य सोलापूरकरांची भावना आहे. सोलापूरचा आवाज वरपर्यंत पोहोचतच नाही, पोहोचला तरी त्याला गांभीर्याने घेतले जात नाही, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आश्वासक चेहरा ठरू शकतात.

यापूर्वी शिंदे यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, दोन वेळाही ते रिंगणात उतरले होते. या वेळी मात्र तशी शक्यता नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. शिंदे यांच्या 'जनवात्सल्य' या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गजबज वाढली आहे. काँग्रेसच्या कार्यालयातही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती या सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. 2014 आणि 2019 ला मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवत आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. विरोधकांना त्या पुरून उरल्या होत्या. मध्यंतरी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालताना त्यांना थोडी कसरत करावी लागली. यातूनच काही जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. मात्र, नंतर त्या सावरल्या आहेत. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा लढल्या तर भाजपसाठी ही निवडणूक मागच्या वेळीप्रमाणे सोपी राहणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बाबा मिस्त्री उपयुक्त उमेदवार

प्रणिती शिंदे लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, यावरही बराच काथ्याकूट होणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून चांगली लढत दिली होती. कायम जनसेवेत राहणारे मिस्त्री हे प्रणिती यांच्या जागी उपयुक्त उमेदवार ठरू शकतात. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी फक्त जनसेवक असणे पुरेसे नसते. प्रणिती शिंदे हमखास निवडून येणाऱ्या या मतदारसंघातून ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांचेही नाव समोर येऊ शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. यासह अन्य काही नावेही समोर येण्याची शक्यता आहे. सुरक्षित मतदारसंघामधून काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. येत्या काही महिन्यांत हे चित्र स्पष्ट होईल.

Praniti Shinde
Maratha Reservation Protest : भुजबळांच्या मतदारसंघात प्रत्येक मोठ्या गावात होणार उपोषण!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com