
प्रमिला चोरगी
Solapur, 02 March : सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसने एकेकाळी मोठे वैभव पाहिले आहे. मात्र, सध्या सोलापुरात काँग्रेसची प्रकृती तोळामासाची झाली आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नेते आणि कार्यकर्ते पक्षासोबत राहिले आहेत. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने एक सर्वसमावेश नेतृत्व सोलापूर काँग्रेसने अनुभवले आहे. मात्र, त्यांच्या उत्तराधिकारी खासदार प्रणिती शिंदे यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यापासून काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही.
प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या ‘स्ट्रॅटेजी’मुळेच विधानसभेला पक्षाच्या हाती भोपळा आल्याची चर्चा जिल्ह्यात उघडपणे सुरू आहे. महापालिकेतील 14 पैकी 10 नगरसेवकांनी यापूर्वीच पक्षाची साथ सोडलेली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ‘ज्यांच्या मागे जनाधार, त्यांनाच पदे मिळणार’ हे वक्तव्य हास्यास्पद ठरते. आता प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाबाबत दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
नव्या जिल्हाध्यक्षपदाच्या अनुषंगाने प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या शासकीय विश्रामृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा आधार घेत ‘ज्यांच्या पाठीशी जनाधार आहे, त्याच कार्यकर्त्यांना पदावर यापुढे संधी दिली जाईल, असे म्हटले होते. मात्र, खुद्द प्रणिती शिंदे यांच्या डावपेचामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अनुकूल वातावरण असूनही जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही. खरं महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी सुसंवाद ठेवत योग्य रणनीती आखली असती तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसला यश मिळविता आले असते, एवढे चांगले वातावरण सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला होते.
सोलापुरात ज्या जागा काँग्रेसला सहज मिळणे अपेक्षित असताना खासदार प्रणिती शिंदे यांच्या चुकीच्या धोरणामुळे विधानसभेला पक्षाचे पानिपत झाले. त्या पराभवातून धडा घेऊन जनतेच्या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्री मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापलिकडे प्रणिती शिंदे यांनी कोणतेही पाऊल टाकलेले नाही. सोयाबीन, दूध, उसाचे बिल, सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या सोलापूरकरांसमरे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची संधी असते, त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे औचित्य प्रणिती शिंदे यांना पाळता आलेले नाही.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षसंघना प्रचंड खिळखिळी झालेली आहे. पक्षासाठी जीव ओतून काम करणारे कार्यकर्तेच राहिलेले नाहीत, त्याला नेतृत्व करणाऱ्या प्रणिती शिंदे ह्याच जबाबदार असल्याचा आरोप आहे. संकटकाळात पक्ष पाठीशी उभा राहत नसल्याची खंत अनेक कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यानंतरही संघटना बांधणीसाठी बैठका होत नाहीत. तसेच, कार्यकर्त्यांशी संवादही साधला जात नसल्याचे वास्तव आहे.
भेटीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, त्यामुळे अनेकांनी पक्षापासून चार हात लांबणे राहणे पसंत केले आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले होते, त्यातील केवळ चार नगरसेवक पक्षासोबत राहिले आहेत. पक्षापासून दुरावलेले कार्यकर्ते एमआयएम आणि भाजपकडे वळताना दिसत आहेत. सध्या पक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील, तेवढेच नेते शिल्लक राहिले आहेत. कार्यकर्ते तर पक्षापासून मोठ्या प्रमाणात दुरावले आहेत, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकळ यांना जिल्हाध्यक्ष नेमताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
प्रणिती शिंदेंविषयीच्या तक्रारी
खासदार प्रणिती शिंदे फोन उचलत नाहीत. कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. एखादी समस्या घेऊन गेल्यास तासन्तास ताटकळत थांबवले जाते. ठराविक कार्यकर्त्यांचे ऐकले जाते आणि इतरांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. प्रणिती शिंदे म्हणतील तीच पूर्वदिशा, त्यामुळे अनेक जुने जाणते कार्यकर्ते पक्षाच्या बैठकीपासून लांब राहत आहेत.
आतापर्यंत कोणी कोणी पक्ष सोडला?
राष्ट्रीय सेवा दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांनी मागील आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, सुधीर खरटमल, माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, यू. एन. बेरिया, नागेश ताकमोगे, बाबा मिस्त्री, फिरदोस पटेल या महत्वाच्या नेत्यांनी पक्षातून बाहेर जाणे पसंत केले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.