
Solapur, 11 August : माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भोसे येथील कार्यक्रमात पंढरपूर तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास सांगत असताना गटतटाच्या आणि पक्षांतरांच्या घटनांवर भाष्य केले. ते करत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना टोले लगावले. कल्याणरावचं बरं आहे. ते म्हणतात, आता माझा कुठलाच पक्ष राहिलेला नाही...मुंबईत हातात गंडा बांधलेले कल्याणराव पंढरपूरमध्ये आल्यावर काँग्रेसकडे जातात, असा टोलाही परिचारक यांनी लगावला.
माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) म्हणाले, पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी राजकारणात पक्ष गटतट राहतील. मुंबईत मी आणि कल्याणराव जेवायला बसलो होतो, तर त्यांच्या हातात गंडा (शिवसेनेचा) दिसला. मी विचारलं, काय हो हे कल्याणराव काय..? ते म्हणाले, ‘काय नाही, हातात बांधून आलोय,’ असं ते म्हणाले. मी म्हटलं ‘हे कशाला...काय..?
मुंबईहून पंढरपूरला येतोय, तर कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) म्हणाले, मालक बघा जरा शेतकरी संघटनंचं जमतंय का? म्हणजे संजयमामा शेतकरी संघटनेकडंनं, मी शेतकरी संघटनकडंनं. त्यावेळी कल्याणरावही म्हणाले, ‘बघा जरा आपलंही शेतकरी संघटनकडंनं, होऊ द्या काय व्हायचं ते.’ आम्ही राजू शेट्टी यांना फोन लावतो, तोवर कल्याणराव चालले काँग्रेसकडे...मलाच कळंना काय होतंय, असा किस्साही परिचारकांनी सांगितला.
प्रशांत परिचारक म्हणाले, सूर्य, चंद्राला ज्या पद्धतीने ग्रहण लागतं, त्याप्रमाणे पंढरपूरला एका वर्षात ग्रहण लागले. तेरा तारखेला राजूबापू पाटील यांचं निधन झालं,त्यानंतर १७ तारखेला मोठ्या मालकांचं (सुधाकरपंत परिचारक), तर काही दिवसांनी भारतनाना यांचं निधन झालं. कोविडच्या कालखंडात अनेक कुटुंबातील कर्ती माणसं आपल्यातून गेली. पंढरपूरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
पंढरपूर तालुक्यात १९६० पासून विचाराचं राजकारण झालं. औदुंबरअण्णा पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान हे पंढरपूर तालुक्याच्या जडघडणीत आहे. विकास कसा असावा, हे दाखवायचे असेल तर आजही भोसे गावचे उदाहरण दिले जाते. आमच्याकडे जवळपास २५ वर्षे आमदारकी होती. पण भोसे गावासारखा विकास कधी करता आलेला नाही, असेही परिचारक यांनी मान्य केले.
ते म्हणाले, यशवंतभाऊ पाटील यांनी काम केलेले सर्व कालखंड मी बघितले आहेत. पहिले सरकारकडे रिर्सोस फार कमी होते. मी १९८८ मध्ये सरपंच झालो, तेव्हा ग्रामपंचायतीला एक लाख ते सव्वा लाख रुपये निधी यायचा. पण आज सरपंच सहज कोटीच्या भाषा करतोय. आमदार तर चार हजार आणि पाच हजार कोटींच्या खाली बोलतच नाही. पण त्या वेळी लोकांच्या अपेक्षाही कमी होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.