

Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब करत शरद लाड यांच्याऐवजी स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शरद लाड आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले असून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. तर लाड यांचा हा अर्ज कदाचित डमीही असू शकतो, असाही तर्क आता लावला जात आहे. ऐनवेळी उमेदवाराचा अर्ज बाद झाला किंवा काही तांत्रिक गोष्ट आली तर अडचण नको, म्हणून असे केलं जात असावं असेही आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी रविवारी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता योगेश जाधव, नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपने उमेदवारी दिली. पुणे पदवीधरमधून शरद लाड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असतानाच ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला.
मात्र, त्यानंतर आज शरद लाड हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय कार्यालयात पोहोचले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘पक्षानेच मला अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे,’ असे लाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही लाड अर्ज का दाखल करत आहेत, याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
लाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे लाड यांचा अर्ज हा पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा भाग आहे की त्यामागे काही वेगळे राजकीय गणित आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारून स्मिता जाधव यांना संधी देण्याचा भाजपचा निर्णय हा धक्कादायक मानला जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे इच्छुकांची यादी घेऊन शनिवारी दिल्लीला गेले होते. भाजपच्या हायकमांडसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या समवेतही त्यांची चर्चा झाली. त्यानंतर रविवारी तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
आता मात्र लाड यांनी अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतल्याने पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी आणि शरद लाडांचा उमेदवारी अर्ज, या दोन्ही घडामोडींचा पुढचा राजकीय अर्थ काय निघतो, हे अर्ज छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.