
पुण्याच्या शिक्षण वैभवात मोठी भर पडणार असून आयआयएम मुंबईचं नवं केंद्र इथे सुरू होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
Pune News : पुणे ज्याला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते, त्या शहराच्या शैक्षणिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयएम मुंबईचे नवे केंद्र आता पुण्यात सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आयआयएम मुंबईच्या डीन कमिटी आणि शैक्षणिक परिषद यांनी मान्यता दिल्याने हा निर्णय अंतिम झाला आहे.
मोहोळ यांनी पुण्यात आयआयएम केंद्र स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला नुकतीच मंजुरी मिळाली. या केंद्राच्या स्थापनेमुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होणार आहे. पुणे हे तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि संशोधन-विकास केंद्रांचे प्रमुख हब म्हणून उदयास येत आहे.
यासोबतच शहराची शैक्षणिक परंपरा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते जाळे यामुळे आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यासाठी एक परिपूर्ण जोड ठरणार आहे. हे केंद्र स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण उपलब्ध करेल आणि उद्योजकतेला चालना देईल.
या केंद्रामुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतील. हा उपक्रम ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत असून, स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारा आहे, असे मानले जात आहे. आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, “आम्ही 2026 च्या शैक्षणिक वर्षापासून पुणे केंद्रात क्षमता विकास आणि अल्पकालीन कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संधीसाठी आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानतो. यामुळे आयआयएम मुंबईला विकसित भारताच्या ध्येयात योगदान देण्याची संधी मिळेल.”
याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन शहरांमधील ‘नॉलेज कॉरिडॉर’ देशाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी एक नवा अध्याय लिहील.
हा निर्णय महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी दिशा देईल आणि तरुण पिढीला संधींचे नवे द्वार खुले करेल. पुणे हे शैक्षणिक केंद्र असण्यासोबतच तंत्रज्ञान आणि आयटी क्षेत्रातील एक बळकट हब बनले आहे. याच वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबईने पुण्यात आपले नवे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”
1. आयआयएम मुंबईचं नवं केंद्र कुठे सुरू होणार आहे?
पुण्यात.
2. या प्रस्तावाला मंजुरी कोणी दिली?
केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
3. पुण्याला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ का म्हणतात?
उच्च शिक्षण संस्थांच्या मोठ्या संख्येमुळे आणि दर्जेदार शिक्षणामुळे.
4. या निर्णयाचा पुण्यातील विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
विद्यार्थ्यांना आयआयएमसारख्या अग्रगण्य संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळेल.
5. आयआयएम मुंबई हे कोणत्या क्षेत्रातील शिक्षण संस्थांमध्ये अग्रगण्य आहे?
व्यवस्थापन (Management) शिक्षण क्षेत्रात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.