K. P. Patil: ‘कुणी उमेदवारी देता का,उमेदवारी..; सर्वांचे उंबरे झिजवले, तरीही के.पी. पाटील वेटिंगवरच...

Radhanagari Assembly Constituency Candidature K. P. Patil: के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. मात्र सातत्याने सोईस्कर भूमिका घेणाऱ्या के.पी. पाटील यांनाच आघाडीतील नेत्यांनी पक्षप्रवेशावरून वेटिंग वर ठेवल्याचे चित्र आहे.
K. P. Patil
K. P. PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: निवडणूक तोंडावर आली की अनेकांच्या कोलांटउड्या सुरू होतात. राजकीय स्वार्थ शोधून राजकारणात मोठे केलेल्या पक्षालाच कोलादांडा दाखवण्याची सवय लोकप्रतिनिधींना लागली आहे. वारंवार पक्ष बदलणे आता राजकीय नेत्यांची सोईस्कर भूमिका नित्याचीच बनली आहे. हीच परिस्थिती राधानगरी विधानसभा मतदारसंघातील (Radhanagari Assembly Constituency) महायुतीतील नेत्यांची आहे.

माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांची उमेदवारीवरून सुरू झालेली गोची यातच एक उदाहरण म्हणावे लागेल. बिद्री सहकारी साखर कारखान्यावरील कारवाई थांबवण्यासाठी महायुतीत प्रवेश केला. असा माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर आरोप होत असताना विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीकडे पावले वळवली आहेत. उमेदवारीसाठी मविआ मधील सर्व पक्षांचे उंबरे झिजवून देखील शाश्वत उमेदवारीचा शब्द मिळत नसल्याने अद्याप वेटिंग वरच असल्याचे चित्र आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत ही शिवसेनेला जाणार असल्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के.पी पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. मात्र सातत्याने सोईस्कर भूमिका घेणाऱ्या के.पी. पाटील यांनाच महाविकास आघाडीतील नेत्यांनी पक्षप्रवेशावरून वेटिंग वर ठेवल्याचे चित्र आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघ यंदा विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत राहिला आहे. महायुतीत दोस्तीत कुस्ती होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी राजीनामा देत आपल्या चर्चेवर पूर्णविराम लगावला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील राजीनामा देत बंडाचे निशाण फडकवले आहे.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी महायुतीत राहून महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे उंबरे उमेदवारीसाठी झिजवण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात दंड थोपाटण्यासाठी के. पी. पाटील सज्ज आहेत.

K. P. Patil
BJP Operation Lotus: काँग्रेस आमदाराला फोन, भाजपाला हवे आहेत 50 आमदार विकत; पुन्हा 'ऑपरेशन लोटस', सरकार पाडण्यासाठी 100 कोटींची ऑफर

आबिटकर यांच्यानंतर दोन नंबरचे मतदान मिळवण्यात के.पी. पाटील हे आघाडीवर आहेत. पण ए. वाय. पाटील आणि राहुल देसाई यांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे देत इतर पक्षाची वाट न पाहता अपक्ष म्हणून बंडाची तयारी ठेवली आहे. मात्र के. पी. पाटील यांनी अद्याप ठोस निर्णय न घेता इतर पक्षातून निवडणूक लढवण्याचा अट्टाहास मनात ठेवला आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरोधात उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे.

महायुतीत ही जागा शिवसेनेला जाणार असल्याने माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीचा रस्ता निवडला आहे. मात्र महाविकास आघाडीने अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच के.पी पाटील आणि आमची दोन वेळा भेट झाली असल्याचा दाखला दिला. उमेदवारीची शाश्वती दिली गेली नाही. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी के. पी. पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.

नुकतेच के. पी. पाटील यांच्या शिष्ठमंडळाने काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. मात्र जागा वाटपात ही जागा कोणाकडे जाणार हे उलगडले नसल्याने के. पी. पाटील यांच्या उमेदवारीवर आत्ताच बोलणे योग्य नसल्याचे सतेज पाटलांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महिनाभरापूर्वी माजी आमदार के पी पाटील यांनी मुंबईत भेट घेतली. या भेटीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. मात्र उद्धव ठाकरे यांनीच ही जागा कोणाकडे जाणार हे आत्ताच सांगता येत नसल्याने उमेदवारीचा शब्द देणे टाळला. इतकेच नव्हे तर जागावाटप झाल्यानंतरच पक्षप्रवेश करण्यावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्राने सरकारनामाला दिली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात के. पी हे मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट घेणार असल्याची माहिती आहे.

एकंदरीत पाहता गेल्या पंधरा दिवसात माजी आमदार के पी पाटील यांची भूमिका संभ्रमात राहिली आहे. रोज या ना त्या पक्षाची होणारी चर्चा आता कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल होत असून रोज होत असलेल्या चर्चेमुळे माजी आमदार के पी पाटील यांचा गट कुंमकवत होत आहे. त्याचा फायदा विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com