
Markadwadi News : भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहित-पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते (Ram Satpute) यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या त्यांच्या पराभवासाठी सोलापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या मोहिते पाटलांनीच जोर लावल्याची चर्चा आहे, असा आरोप खुद्द सातपुतेंनीही केला असून मोहिते-पाटलांवर जोरदार हल्ले चढवणे सुरुच ठेवले आहे.
यातच त्यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी उचलून धरली आहे. यातच आता एक वर्षांत मोहिते-पाटलांना तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा दम राम सातपुतेंनी दिला आहे.यामुळे सोलापूरचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधवर बहिष्कार टाकत मारकडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावरुन मोठा लढा सुरू झाला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी या लढ्यात उडी घेतली आहे. पवारांनी मारकडवाडीत जाऊन या ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता.
मारकडवाडी येथे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आर या पारची लढाई छेडत थेट मोहिते-पाटलांनाच आव्हान दिले आहे.
राम सातपुते म्हणाले, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील जनतेचं गोचिडाप्रमाणे रक्त पिण्याचं काम केलं आहे. आता आपलं सरकार असून सुमित्रा बँक ज्यांनी बुडवून खालली,त्या जयसिंह मोहिते पाटलांना वर्षांच्या आतमध्येच तुरुंगात टाकलं, नाहीतर राम-सातपुते नाव लावणार नाही,असा इशाराच सातपुते यांनी दिला आहे.
माजी आमदार राम सातपुतेंनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कडवट भाषेत शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले,त्यांना स्वत:चा मुलगा निवडणुकीत निवडून आणता आला नाही.आणि ते आता माझ्या मतांचा हिशोब लावायला निघाले आहेत. त्यांनी ऊसाला अवघा 2600 रूपये दर दिला. मोहिते पाटलांनी विजय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक,सुमित्रा पतसंस्था बुडवून खालली.त्या मोहिते-पाटलांना माती चारायचं काम माळशिरस तालुक्यातील जनतेनं केल्याचा दावाही सातपुतेंनी यावेळी आपल्या भाषणात केला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केलेल्या टीकेलाही भाजपच्या राम सातपुतेंनी पलटवार केला आहे. मोहिते पाटील म्हणाले,‘मी माझे घर विकलं.पण त्यांना मी सांगू इच्छितो, राम सातपुतेचं घर विकणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. हा राम सातपुते रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे असंही सातपुतेंनी ठणकावलं.
सातपुते यांनी मोहिते पाटलांवर हल्ला चढवल्यानंतर अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल असंही स्पष्ट केलं आहे.तसेच शेतकऱ्यांना लुटणाऱ्या शंकरराव मोहिते-पाटील कारखान्यावर पुढील सात ते आठ महिन्यांत प्रशासक आणल्याशिवाय राहणार नाही असा पवित्राही त्यांनी बोलून दाखवला.याचवेळी त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं आणि धमक्या दिल्यातर भरचौकात मारू,असा इशाराही सातपुते यांनी मोहिते पाटलांसह त्यांच्या समर्थकांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस मतदारसंघाचे आमदार उत्तमरा जानकरांनी राम सातपुते यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे., ते म्हणाले, सातपुतेंना रणजित मोहिते पाटील यांच्या जागेवर विधान परिषदेवर जायचं आहे. त्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे.मोहिते-पाटलांनी आजपर्यंत खूप लोकांना हाताळलं आहे.उंदरानं गडबड करून मोहिते पाटील कधीही संपणार नाही.
उंदराचं सुळसुळाट झाला म्हणून पवार साहेबांना काही फरक नाहीत.असे घुशी, साप, उंदरं पळत असतात. ही मंडळी मागील १० वर्षांत मारकडवाडी गावात का गेले नाहीत असा सवालही जानकरांनी उपस्थित केला.तसेच अनेक भुंकणारे लोकं असतात.पण आपण लढवय्या असून ईव्हीएमचा सोक्षमोक्षच करणार असून मी माझा हक्क मिळवणारच असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे सध्या गाव ईव्हीएम विरोधात लढा देणाऱ्याचं केंद्रबिंदू ठरलं आहे. त्यातच रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीतील सभेतून थेट शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. म्हणाले, देशात ईव्हीएम काँग्रेस आणलं. ईव्हीएमवर मतदान झाल्यानंतर यांनी 2004 ला केंद्रात दहा वर्ष सत्ता भोगली आणि राज्यातही सत्ता भोगली आणि आता म्हणतायत EVM काहीतरी गडबड करतंय. लोकसभेला तुमची पोरगी 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.