Phaltan Politic's : रामराजे गटापुढे अस्तित्वाची लढाई; तर इनकमिंग वाढलेल्या माजी खासदारापुढे हे मोठे चॅलेंज

Local Body Election 2025 : दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात राजकीय तापमान वाढले आहे. रामराजे गट अस्तित्वासाठी झगडत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर समन्वयाचे मोठे आव्हान उभे आहे.
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या: दिवाळीनंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने फलटण तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

  2. राजे गट व निंबाळकर गट आमने-सामने: पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजे गट अस्तित्वासाठी झगडणार असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गट समन्वयाचे मोठे आव्हान पेलणार आहे.

  3. बहु-आघाडीचे समीकरण बदलणार: भाजप महायुतीसह राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि वंचित आघाडी यांच्यामुळे तालुक्यातील राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे.

Phaltan, 20 October (अमोल पवार) : सध्या वाजत असलेले स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडघम अनेकांची झोप उडवणारे ठरले आहेत. दिवाळीनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत असल्‍याने फलटण तालुक्यामध्येही सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून ढासळणाऱ्यी बुरुजाची पडझड थांबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीर रामराजे गटाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे, दुसरीकडे, विधानसभेतील यशानंतर कार्यकर्त्यांची लागलेली रांग पाहता समन्वयाचे मोठे आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांपुढे असणार आहे.

तालुक्‍यातील तरडगाव, साखरवाडी (पिंपळवाडी), विडणी, गुणवरे, बरड, कोळकी, वाठार निंबाळकर, हिंगणगाव या गटांमधून जिल्‍हा परिषदेसाठी आठ, तर पंचायत समितीसाठी १६ सदस्‍य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत यंदा राजे (रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar) गट अस्‍तित्‍वासाठी झगडेल, तर विधानसभेतील यशानंतर इनकमिंगचा जोर वाढलेल्‍या माजी खासदार निंबाळकरांच्या गटापुढे समन्‍वयाचे आव्‍हान असणार आहे.

यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीवर राजे गटाची निर्विवाद सत्ता होती; परंतु कोविडच्‍या काळानंतर लांबलेल्‍या निवडणुकांमुळे तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्‍या काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलत गेल्‍याने राजे गटातील अनेक बुरूज ढासळले, तर केंद्रात, राज्‍यात सत्तेत असलेल्‍या भारतीय जनता पक्षाकडून खासदारकीची टर्म यशस्‍वी करतानाच रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitSinh Naik Nimbalkar) यांनी आपली तालुक्‍यातील मांडही पक्‍की करण्‍यावर भर दिला आहे.

दुसरीकडे विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष संजीवराजे आणि बाजार समितीचे अध्‍यक्ष रघुनाथराजे निंबाळकर यांनी लोकसभा, विधानसभेवेळी राजकीय अपरिहार्यतेने घेतलेल्‍या निर्णयांचा परिपाक म्‍हणून अनेकांनी माजी खासदार निंबाळकरांच्या गटाची वाट धरणे योग्‍य समजले.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Gopichand Padalkar : पडळकरांच्या निशाण्यावर पुन्हा जयंत पाटील; ‘राजारामबापू साखर कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही; इथं संघर्ष अटळ...’

आता तालुक्‍यातील राजकारण कोणत्‍या वळणावर जाणार, रामराजे आणि संपूर्ण राजे गट कोणत्‍या मुत्‍सद्देगिरीचे उदाहरण समोर ठेवणार, कणखरपणे बांधला जात असलेला माजी खासदार निंबाळकर गट कोणती रणनीती आखणार, हे सांगणे सध्‍यातरी धाडसाचे ठरण्‍याची शक्यता आहे.

सध्‍या दोन्‍ही बाजूंनी पक्षीय, गट स्तरावर बैठका घेण्यात येत आहेत. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही प्रामुख्याने राजेगट व माजी खासदार निंबाळकरांच्या गटात होणार असली, तरी माजी खासदार निंबाळकरांचा गट हा पंचायत समितीवर आपला ताबा मिळवण्यासाठी लढणार असून, राजे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा पराभव झाला होता; परंतु त्यांना फलटण तालुक्यातील मतदारांनी मताधिक्‍य दिले होते. त्‍यानंतर लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मित्र सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी दिली आणि विरोधी राजे गट पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव केला.

या विजयामुळे माजी खासदार निंबाळकरांच्या गटात नवचैतन्य आले आहे, तर राजे गट अजूनही पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडलेला दिसत नाही. राजे गटाचे एकेक निष्ठावंत मावळे बाहेर पडताना दिसत आहेत. आपल्याला काही फरक पडत नाही, हा अतिआत्मविश्वास सोडून देऊन नवीन चेहरे, नवीन नेतृत्व निर्माण करून, मतदारांना विश्वासात घेऊन राजे गटाला आपली अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

फलटणच्या महायुतीत भाजप पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटना यांना बरोबर घेऊन त्यांना सत्तेच्या वाट्यात सहभागी करून एकत्रित निवडणुका लढवल्या जाणार का? हे देखील पाहावे लागणार आहे. भाजपमध्ये असलेले जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नवीन प्रवेश केलेले नेते यांच्यामध्‍ये नसलेला ताळमेळ व इच्छुकांची भाऊगर्दी ही डोकेदुखी ठरणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाची फलटणमध्ये ताकद असून, त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. लोकसभेला भाजपबरोबर असलेल्या या पक्षाने विधानसभेला स्वतःचा उमेदवार म्हणून दिगंबर आगवणे यांना उभे केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाने या वेळी स्वतंत्र उमेदवार उभे केल्यास याचा फटका कोणाला बसणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तसेच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, प्रहार, सह्याद्री कदम यांचा गट कोणाला पाठिंबा देणार, यावर तालुक्‍याची पुढील राजकीय वाटचाल निश्‍चित होणार आहे, तसेच बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, मराठा क्रांती मोर्चाचे सदस्‍य यांच्या भूमिकाही निर्णायक असणार आहेत.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Dattatray Bharane Solapur Tour : राष्ट्रवादीच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजितदादांचे विश्वासू दत्तामामा सोलापूर दौऱ्यावर; नाराजांची समजूत काढणार?

राजे गटाच्‍या जमेच्‍या बाजू

- आदर्की ते आंदरूड या दुष्काळी पट्ट्यात कालव्याद्वारे सिंचन योजनेतून झालेली जलक्रांती

- कमिन्स कंपनीचा औद्योगिक प्रकल्प

- तालुक्यातील शैक्षणिक क्रांती

- राजे गटाशी निगडित संस्‍थांमध्‍ये स्थानिकांना रोजगार

यासह सत्ता असलेल्या गावखेड्यात कोट्यवधींच्या विविध विकास योजना

................................................................

माजी खासदार निंबाळकर गटाच्या जमेच्या बाजू

फलटण-पुणे रेल्वे सुरू

तालुक्यातून गेलेल्‍या पुणे- पंढरपूर महामार्गाचे काम

नीरा-देवघर पाणी प्रकल्प योजना

फलटण येथे नवीन विविध शासकीय कार्यालये,

प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय सुरू

आगामी होऊ घातलेली नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत

Q1. फलटण तालुक्यातील निवडणुकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहेत?
A1. राजे गट आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गट हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

Q2. राजे गटाला कोणते आव्हान आहे?
A2. लोकसभा व विधानसभा पराभवानंतर गटाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.

Q3. निंबाळकर गटाची स्थिती कशी आहे?
A3. विधानसभेतील विजयामुळे गटात नवचैतन्य असून, समन्वय आणि ताळमेळ राखण्याचे आव्हान आहे.

Q4. या निवडणुकीत कोणते इतर घटक निर्णायक ठरू शकतात?
A4. राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित आघाडी आणि शिवसेना यांची भूमिका तालुक्यातील निकालावर निर्णायक ठरेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com