
कऱ्हाड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसले, पाटील आणि उंडाळकर गटांमध्ये चुरस वाढली आहे.
भोसले-पाटील गटाचे सख्य वाढल्याने उंडाळकर गटावर दबाव वाढला असून, महायुतीच्या चौकटीत नव्या समीकरणांची शक्यता आहे.
कऱ्हाड दक्षिणमधील ओबीसी महिला आरक्षणामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
Karad, 16 October : कऱ्हाड तालुका हा दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदार संघात विभागला आहे. कऱ्हाड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 12, तर पंचायत समितीचे 24 गण आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले, तर उत्तरमध्ये मनोज घोरपडे हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर या नेत्यांचेही गट तालुक्यात कार्यरत आहेत.
सध्या ॲड. उंडाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या चिन्हावर झाल्या किंवा आघाडी आणि महायुतीद्वारेही (Mahayuti) लढवल्या गेल्या तरी त्यात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी लागणार आहे. बदलेली राजकीय समिकरणे पथ्यावर पाडून घेऊन आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात बाजी मारण्यासाठी नेत्यांनीही कंबर कसली आहे.
कऱ्हाड (Karad) पंचायत समितीवर गेली अनेक वर्षे माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सभापती, उपसभापती पदावर अनेकांना (कै) उंडाळकर यांनी संधी दिली आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाशी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जुळवून घेऊन पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवली. त्यामुळे आमदार डॉ. भोसले गटाच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागले.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन माजी सहकारमंत्री पाटील आणि ॲड. उंडाळकर यांच्या गटाचा सवता सुभा आहे. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निमीत्ताने यापूर्वी विरोधात असलेले पाटील व भोसले गट एकत्र आले तर उंडाळकर गटाने बाळासाहेब पाटील गटापासून फारकत घेतली.
बाजार समितीच्या निवडणुकीतही तेच समीकरण राहिले. मात्र त्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री चव्हाण हे उंडाळकरांसाठी मैदानात उतरले, तर कऱ्हाड उत्तरेतील पाटील गटाचे विरोधक विद्यमान आमदार मनोज घोरपडे, भाजपचे धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी उंडाळकरांना साथ दिली. सर्वांच्या साथीने बाजार समितीची निवडणूक उंडाळकरांना जिंकता आली.
ॲड. उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी आमदार घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी तयारी करुनही माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवली. त्यामुळे त्यांचाही गट चार्ज झाला आहे. सध्या तालुक्यात सर्वच नेत्यांचे गट हे सक्रीय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्वासाठी सर्वच नेत्यांनी ताकद लावली आहे.
भोसले-पाटील गटाचे वाढते सख्य
सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा गट एकत्र आला, त्यामुळे पाटील यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे दोन्ही गटाचे सख्य वाढले आहे. त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही त्या दोन्ही गटांनी एकत्र निवडणुक लढवून उंडाळकरांना शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दोन्ही गट एकत्र राहून निवडणुकीत एकमेकांनी मदत करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्या दोन्ही नेत्यांची छायाचित्रे असलेले लागणारे फ्लेक्सही त्याचीच पुष्टी देतात. मात्र निवडणुका लढवण्याबाबत पक्षीय पातळीवर काय निर्णय होणार, यावरही त्यांची आघाडी अवलंबून असणार आहे.
उंडाळकर-भोसले गट एकत्र येणार ?
राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुतीचे सरकार आहे. सध्या तरी महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रित निवडणुका लढवण्याचे संकेत दिले जात आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये यापूर्वी उंडाळकर आणि भोसले गट एकत्र होते. मात्र, कृष्णा कारखाना, विधानसभा निवडणुकीमुळे दोन्ही गटात विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे.
मध्यंतरीच्या काळात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या गेल्या तर महायुतीचे घटकपक्ष म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या लागतील. तसे झाले तर उंडाळकर आणि भोसले गट वैरत्व विसरुन एकत्र येणार का? याचीही उत्सुकता तालुक्यात आहे.
मातब्बरांची झेडपीत पुन्हा होणार एन्ट्री
कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटापैकी पाल, उंब्रज, मसुर, तांबवे, येळगाव या पाच गट खुले झाले आहेत. माजी जिल्हा परिषद ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे प्रतिनिधीत्व करत असलेला येळगाव गट खुला झाला आहे. पाल गटही खुला झाल्याने तेथे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती देवराज पाटील, मसूर गटही खुला झाल्याने माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, तांबवे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील या मातब्बरांसह उंब्रजकरांनाही पुन्हा संधी चालून आली आहे.
कऱ्हाड दक्षिणला झेडपी अध्यक्षपदाची संधी ?
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. तालुक्यातील विंग, काले हे गटही ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहेत. हे दोन्ही गट कऱ्हाड दक्षिणमध्ये येत असून त्या गटावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारीसाठी दावा असणार आहे. त्यामुळे त्या गटातून निवडून येणारी महिला ही जिल्हा परिषद अध्यपदासाठी दावेदार असणार आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याचीही उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.