सोलापूर : कर्नाटक विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीला आत्मविश्वास, तर भाजपला अस्वस्थता दिली आहे. कर्नाटकातील भाजपच्या अपयशाला असलेल्या अनेक कारणांपैकी तेथील आरक्षण फॅक्टरदेखील महत्त्वाचे कारण मानले जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारने मुस्लिम समाजाचे चार टक्के आरक्षण काढून पंचमसाली लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाला प्रत्येकी दोन टक्के आरक्षण दिले.
मुस्लिमांचे आरक्षण लगेच निघाले. परंतु पंचमसाली लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाला वेळेत आरक्षण मिळाले नाही. त्याचा मोठा फटका भाजपला बसल्याचे दिसते. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहे. कर्नाटकात (Karnataka) दिसलेला आरक्षण फॅक्टर महाराष्ट्रातही (Maharashtra) आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. (issue of reservation, which become important in Karnataka elections, will increase the headache of Shinde-Fadnavis)
कर्नाटकातील कुडल संगम येथील लिंगायत पंचमसाली मठाचे मठाधिपती बसवजय मृत्यूंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली कुडल संगम ते बंगळूरपर्यंत पदयात्रा काढून पंचमसाली लिंगायत समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधले. प्रतिज्ञा पंचायत अभियान राबविले. महाराष्ट्रात तर मराठा समाजाचे ५४ मूकमोर्चे निघाले. आरक्षणासाठी ४२ जणांनी प्राण दिले. मूकमोर्चाने प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर आक्रोश मोर्चे, आसूड मोर्चेही निघाले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु २०१९ नंतर ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार असो की आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असो, यांनी आरक्षणासाठी कमी-अधिक प्रयत्न केले. या प्रयत्नांतून काय साध्य झाले?, मराठा समाजाच्या आजची आरक्षण स्थिती काय आहे? याचा विचार केल्यास निराशाजनकच उत्तर मिळते.
आषाढी एकादशीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात आषाढीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेला येऊ दिले जाणार नसल्याचा इशारा पंढरपुरातील मराठा समाजाच्या संघटनांनी यापूर्वीच दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी योगेश केदार यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने तुळजापूर ते मुंबई अशी वनवास यात्रा सुरू केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण मिळते. परंतु ते न्यायालयात टिकत नसल्याचा पक्का अनुभव मराठा समाजाला आला आहे. पन्नास टक्क्यांच्या पुढील आरक्षण न्यायालयात टिकत नसल्याने मराठा समाजाला ओबीसीमधूनच पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण द्यावे, ही मागणी मराठा समाजातून पुढे येऊ लागली आहे. मराठा समाजाची ही मागणी येत्या काळात राज्य सरकारपुढील पेच आणखी वाढविण्याची शक्यता आहे.
आरक्षण संपले, सरकार टिकले
गेल्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या मुद्यांचा निकाल लागला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दाखल झालेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सध्या तरी टिकविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असताना केंद्रातील भाजप नेतृत्वाने मराठा समाजाला अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद दिले.
सद्यःस्थितीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संपले; पण मुख्यमंत्रिपद टिकले, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी उपचारात्मक (क्युरेटिव्ह) याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने सर्व्हेक्षण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होईल का? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
मराठी मुस्लिमांची भूमिका महत्त्वाची
कर्नाटकच्या निवडणुकीत तेथील मुस्लिम समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल्याचे दिसले. मतांची विभागणी टाळण्यासाठी तेथील मुस्लिम समाज जनता दलाच्या (सेक्युलर) मागे फारसा गेला नाही. काँग्रेससोबत मुस्लिम समाज राहिल्याचे निकालातून दिसले. महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षण फेटाळताना मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण न्यायालयाने मान्य केले होते. हे आरक्षण मान्य झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष सत्तेचे वाटेकरी झाले. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची महाराष्ट्रात मात्र अंमलबजावणी झाली नाही. आगामी काळात महाराष्ट्रातील मुस्लिम समाज काय भूमिका घेणार? यावर देखील बऱ्याच राजकीय घडामोडी व निवडणुकांचे निकाल अवलंबून असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.