

भाजपने सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका अशा तिन्ही निवडणुकांच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळणे शक्य नसल्याचे कारण त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवत त्यांनी प्रमुखपदातून मुक्त करण्याची विनंती केली.
Solapur, 20 December : भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रमुखपदाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करण्यात यावे, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti ) यांच्या जोडीने प्रभारीपदाची जबाबदारी ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आली होती. मात्र, कल्याणशेट्टी यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीचे काम करण्यास नकार दर्शविला आहे. त्याला पक्षांतर्गत गटबाजीचे कारणही असू शकते, त्यामुळे कल्याणशेट्टी यांनी सोलापूरची जबाबदारी का नाकारली, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, कल्याणशेट्टी यांनी रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोलापूर (Solapur) महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली, त्याबद्दल पक्षाचे आणि तुमचे आभार. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोलापूर महापालिका निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कधीही लागू शकते.
माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख या दोन्ही जबाबदाऱ्यांना एकच वेळी पूर्ण क्षमतेने न्याय देऊ शकणार नाही, त्यामुळे मला सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती कल्याणशेट्टी यांनी चव्हाण यांना केली आहे.
सोलापूर महापालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने यापूर्वी रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. मात्र, त्यांची उचलबांगडी करत त्या जागेवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड केली होती. पण, कल्याणशेट्टी यांनीही त्याला नकार दिला आहे.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १५ दिवसांपूर्वीच सोलापूर निवडणूक प्रमुखपदी माझी नियुक्ती करू नका, अशी विनंती केली होती. त्यानंतरही प्रदेश भाजपने माझ्याकडे ती जबाबदारी दिली होती. आताही त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला आहे.
माझ्या अक्कलकोट मतदारसंघात जिल्हा परिषदेचे नऊ गट आहेत. त्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारीही महत्वाची आहे. सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी राहिल्यास दोन्हीकडे न्याय देता येणार नाही. महापालिका निवडणुकीच्या नियोजनात गुंतून राहिल्यास आणि तेथे लक्ष केंद्रित केल्यास मतदारसंघातील जिल्हा परिषद-पंचायत समितीकडे दुर्लक्ष होऊ शकते.
प्र.1 : सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपद का नाकारले?
उ. एकाच वेळी अनेक निवडणुकांच्या जबाबदाऱ्यांना न्याय देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्र.2 : त्यांनी ही विनंती कोणाकडे केली?
उ. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली.
प्र.3 : यापूर्वी सोलापूर महापालिकेचे निवडणूक प्रभारी कोण होते?
उ. रघुनाथ कुलकर्णी यांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती.
प्र.4 : कल्याणशेट्टी यांचा मुख्य प्राधान्यक्रम कोणता आहे?
उ. अक्कलकोट मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिंकणे हा त्यांचा मुख्य प्राधान्यक्रम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.