

Sangli Collector : सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नुकतीच डॉ. मैनाक घोष या अत्यंत संवेदनशील आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्याचवेळी बदली झालेल्या अशोक काकडे यांच्याकडे पदोन्नतीने महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाची सूत्रे आली आहेत. इतर वेळी जिल्हाधिकाऱ्यांची बदली हा सामान्य प्रक्रियेचा भाग मानला जातो. यावेळी जिल्ह्याच्या दृष्टीने या बदलीला वेगळे महत्त्व आहे.
अशोक काकडे यांनी काही महिन्यांत कृषी क्षेत्र हेच जिल्ह्याचे बलस्थान आहे हे ओळखून योजना आखल्या. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रम हाती घेतले, ते प्रभावीसुद्धा ठरले. आता काकडे यांची महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आता त्यांनी सांगली जिल्ह्यातील शेतीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मांडलेल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांचेच बळ महत्त्वाचे ठरणार आहे.
काकडे यांनी मिरज ते दिल्ली ‘किसान रेल’ यशस्वी होऊ शकते, हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. जिल्ह्यात पिकणारा भाजीपाला आणि फळे थेट दिल्लीच्या बाजारात पाठवण्यासाठी रस्तेमार्गाचा वापर केला जात होता. त्या ऐवजी रेल्वेने शेतमाल दिल्लीला पाठवण्याचा एक प्रयोग केला गेला. फक्त रेल्वेला वातानुकूलित बोगी जोडून त्यातून शेतमाल पाठवला गेला. आता भविष्यात स्वतंत्र रेल्वेच शेतमाल घेऊन दिल्लीला धावावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. त्याला बळ मिळू शकेल.
जिल्ह्यात १९ प्रकारच्या फळपिकांची यशस्वी व मोठ्या प्रमाणात लागवड होते. युरोप, अमेरिका, आखाती देशांत हा शेतमाल निर्यात केला जातो. या निर्यातीला बळ देण्यासाठी ‘ड्रायपोर्ट’ आणि ‘एअरपोर्ट’ या दोन्ही गोष्टी आवश्यक असल्याची ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने कोणताही किंतू मनात न ठेवता राज्य शासनाकडे मांडली. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे सातत्याने कवलापूर विमानतळासंदर्भात पाठपुरावा केला. ड्रायपोर्टची जागा हा वादाचा विषय असला, तरी या काळात अनेक पर्यायांवर चर्चा घडली आहे. त्याला आता मूर्त स्वरूप द्यायला हवे.
जिल्ह्यात जी १९ प्रकारची फळे पिकतात, त्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात उभे राहणेही गरजेचे आहे. पण, त्यासाठी आवश्यक अन्य सुविधा निर्माण करणे, कंपन्यांना सांगलीत येण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशोक काकडे हे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक झाल्यामुळे त्यांच्याकडून या गोष्टींना बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण, योजना मांडणारे तेच आहेत. आता त्याला गती देण्याची जबाबदारीही ते घेतील का, हे पाहावे लागेल.
शेतमाल निर्यात करताना शेतकरी आणि निर्यातदार कंपन्या यांच्यातील अंतर कमी करणारा प्रयोग अशोक काकडे यांनी केला. त्यासाठी शेतकरी, निर्यातदार संमेलन घडवून आणले. यात सर्वांना एकत्र आणले. त्यातून मंथन घडले आणि निर्यातीला चालना मिळाली. गूळ, बेदाणा आणि हळद या तीन शेतमालांना ‘ऑनलाइन’ बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्नदेखील यशस्वी झाला आहे. प्रयोग छोटे आहेत, मात्र परिणामकारक ठरताना दिसत आहेत.
या सगळ्याबाबत बोलताना अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कृषी निर्यात आणि कृषी औद्योगिक विकासाच्या मुद्द्यांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ते खूप सकारात्मक आहेत. निश्चितपणे त्यासाठी बळ देईन. कारण, हा जगन्नाथाचा रथ आहे. तो सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे. निश्चितपणे सांगली जिल्ह्याच्या विकासाला गती येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.