Sangli News, 22 Nov : अनेक वर्षांपासून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या परिसरात राजकीय आश्रयाखाली नागरिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी सारखी परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनाच्या डोळे झाक भूमिकेमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
अतिक्रमणधारकांना छुप्या पद्धतीने राजाश्रय मिळत असल्याने कारवाईचं धाडस प्रशासनातील एकही अधिकारी दाखवताना दिसला नाही. मात्र याच राजकीय आश्रयाखाली गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त सत्यम गांधी यांनी बुलडोझर चालवला आहे. त्यामध्ये सत्तेतील भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश खाडे देखील सोडलेलं नाही.
खाडे केलेल्या अतिक्रमणावर आयुक्त गांधी यांनी डोझर फिरवला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे सांगली शहरासह मिरज कुपवाड शहराचेही विद्रूपीकरण वाढले होते. फेरीवाले आणि विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागांवर व्यवसाय करण्याऐवजी शहराच्या रस्त्यालगतच अतिक्रमण करून आपापले वेगवेगळे दुकान थाटले होते. तर काहींनी अतिक्रमण करून शेड्स उभारले होते.
यापूर्वी अतिक्रमण काढायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजकीय दबावापोटी माघार घेण्याची वेळ येत होती. मात्र सांगली महानगरपालिकेत आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या चार दिवसांपासून शहराला अतिक्रमण मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. नियोजन आणि ॲक्शनमोडवर येऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील अतिक्रमणांचा सुफडासाफ केला आहे.
चार दिवस सुरू असल्याने या मोहिमेत सांगली शहरातील लक्ष्मी मार्केट परिसर, माधवनगर परिसर, वालचंद कॉलेज परिसर, आपटा पोलीस चौकी, राजर्षी शाहू महाराज रस्ता परिसर, शंभर फुटी रोडसह अन्य परिसरातील पार्श्वभूमी अधिक अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. हे अतिक्रमण काढताना अनेक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विरोध केला.
मात्र विरोध न जुमानता आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाची मोहीम आणखीन तीव्र केली. कोणत्याही परिस्थितीला राजकीय दबावाला सामोरे जाण्याची भूमिका ठेवून अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचं व सामान्य नागरिकांकडून स्वागत झालं. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा मोर्चा माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांच्या विश्रामबाग येथील 'दास' बंगल्यासमोरील बाजूला वळवला.
तिथे असणारे भिंतीचे कुंपण अतिक्रमण हटवण्यात आले. गेले दोन तीन दिवस महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे समाजमाध्यमांवर कौतुक होत असतानाचा आमदार खाडे यांच्या या अतिक्रमणावर बोट ठेवले जात होते. या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका होत असताना पथकाने अचानक आपला मोर्चा या अतिक्रमणाकडे वळवला.
खाडे यांच्या 'दास' बंगल्याशेजारील अतिक्रमणेही हटवण्यात आली होती. खाडे यांच्या बंगल्याचे हे अतिक्रमण मात्र हटवले नव्हते. महापालिकेच्या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यात प्रामुख्याने प्रशासनाला लक्ष्य केले जात असताना इकडे का नाही, असा दोषारोप केला जात होता. या कुंपण भिंतीलगत वाहने पार्क केली जात होती.
पालिकेची कारवाई सुरू होताच गेले दोन दिवस या अतिक्रमणाचे शूटिंग करून ते समाजमाध्यमांवर टाकले जात होते. याची दखल आज प्रशासनाला घ्यावी लागली. जेसीबीने कुंपण भिंत पाडण्यात आली. या कारवाईची प्रेसनोट मात्र सायंकाळपर्यंत काढण्यात आली नव्हती. तथापि या कारवाईच्या कौतुकाच्या पोस्ट मात्र समाजमाध्यमांवर फिरत होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.