Sangli News : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलने करून सांगली जिल्ह्यात युवक काँग्रेस जिवंत ठेवणारे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेशचे सचिव मंगेश चव्हाण यांना प्रदेश सचिव पदावरून हटवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंख छाटण्याचे काम जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने केले असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे आता पुन्हा काँग्रेस अंतर्गत वाद रंगणार आहे. (Sangli Political News)
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना जिल्ह्यातील काँग्रेसकडून कोणतेही आंदोलन केले जात नव्हते. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद असताना चव्हाण यांनी महागाईसह विविध मुद्द्यावर आंदोलने केली होती. 13 वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम करत पक्ष जिवंत ठेवला होता.
त्यांच्या या कार्यकाळात अनेक युवक काँग्रेसच्या प्रवाहात सामील झाले. चव्हाण यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे त्यांच्यावर गुन्हे देखील झाले होते. काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये मंगेश चव्हाण यांचा पराभव झाला होता. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने त्यांना जाहीर विरोध केल्याने त्यांचा पराभव झाल्याची चर्चा होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेव्हापासून जिल्ह्यात मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्याविरोधात कुरघोड्या सुरू होत्या. मात्र पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यांनी काँग्रेसचे काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवले होते.
मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना सचिव पदावरून हटवल्याचे पत्र युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू यांनी दिले आहे. त्यामध्ये पक्ष कार्यामध्ये सक्रिय नसणे, प्रदेश युवकच्या बैठकांना हजर नसणे, पक्ष कार्यक्रम न राबविण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मात्र चव्हाण यांना पक्षाने बैठकीचे निरोपच दिले नव्हते. कार्यक्रमांची माहिती देखील दिली नाही. चुकीचा अहवाल तयार करून जिल्ह्यातील एका नेत्याने त्यांचे पंख छाटण्याचा प्रकार केला आहे. त्यांच्यावर केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
प्रदेश युवक काँग्रेसकडून (Congress) होणार्या कोणत्याही बैठकांना अथवा कार्यक्रमांना मला निरोप दिलेला नव्हता. त्यामुळे बैठका व कार्यक्रमांना उपस्थित राहिलो नाही. जिल्ह्यातील काहींच्या सांगण्यानुसार जाणीवपूर्वक माझ्यावर ही कारवाई करण्यात आली. पण यापुढे कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.