Prithviraj Chavan News : सांगलीची लोकसभेची जागा लढविण्यास काँग्रेस इच्छुक आहे. त्यावर महाविकास आघाडीतून ही जागा कॉग्रेसला मिळावी, यावर आम्ही ठाम आहोत. काँग्रेस पंरपेरची ती जागा आहे. त्यावर हमखास विजय आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. काहीतरी तडजोड करू मात्र, ती जागा कॉंग्रेसच लढवेल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सांगली लोकसभेच्या जागेबाबत ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्या जागेबाबत काँग्रेस अद्याप आग्रही आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सांगलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर चव्हाण मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Loksabha Election 2024 News)
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सांगली लोकसभेची जागा आम्हाला मिळाली की, ती कोणाला द्यायची हा आमचा प्रश्न आहे. त्या जागेवर वसंतदादा पाटील यांच्या घराचा वारसा आहे. त्या घरात उमेदवारी दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण बदलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आम्ही आग्रही आहोत. उद्या त्याबाबत चर्चा होणार आहे.
तडजोड व चर्चेअंती त्यावर निर्णय घेवू. कोल्हापूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गटाला दिली जाणार आहे. सांगलीच्या जागेबाबत पुन्हा चर्चा करणार आहोत, असे म्हटले आहे. त्यावर प्रश्नावर चव्हाण म्हणाले, सांगली लोकसभा महाविकास आघाडीतून काँग्रेसलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिथं जिथं राहुल गांधी जाता आहेत, तिथे तिथे कॉँग्रेसचा पराभव होतो, अशी टीका केली आहे. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. चव्हाण म्हणाले, कर्नाटक, तेलंगणासह अन्य विजयी झालेल्या ठिकाणी राहुल गांधी गेले होते. तेथे विजयच झाला ना, मग ह्या म्हणण्याला काय अर्थ. नरेंद्र मोदी कर्नाटकात गेलेच होते. तेथे त्याच्यामुळे भाजप पराजित झाली, असं म्हणायचं का. त्यामुळे त्याला अर्थ नाही. जय, पराजय होत असतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकशाहीवादी देश भारताच्या लोकशाहीकडे काळजीपूर्वक दृष्टीने पहात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताचा लोकशाही निर्देशांक घसरतो आहे. भारताची लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची जगातील देशांना चिंता आहे. भारतातील लोकशाही संपुष्टात आली तर त्यांचे परिणाम जगात होणार आहेत.
मोदीचे प्रखर विरोधक हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल (Arvind Kejrival) अशा लोकांना तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते. त्याबाबत महाविकास आघाडी (MVA), इंडिया आघाडीत चिंता आहे. त्याबाबत जगातही चिंता आहे. जर्मनी, अमेरिका यांनी कायदेशीर प्रक्रिया अंमलात यावी, असे सांगावे लागते म्हणजे कायदेशीर होत नसल्याची भीती व्यक्त केली आहे.
भ्रष्टाचाराचा गुन्हा घडला असेल तर त्याचे कोणीही समर्थन करणार नाही, पण त्याकरिता तुरूंगात टाकायची गरज नाही. खटला सुरू झाल्यानंतर त्यांना बोलवणे योग्य आहे, परंतु तुरूंगात टाकून त्यांचा आवाज दाबणे, हे आम्हाला मान्य नाही. हे अतिशय निंदाजनक आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसची (Congress) बॅंक खाती गोठवणे, राजकीय पक्षांना आय कर भरावा लागत नसताना कोटींचा दंड लावला जात आहे. विरोधकांचा आवाज बंद करून रशिया, चीनमध्ये होत आहे, त्याचे अनुकरण भारतात होत आहे, असेही ते म्हणाले.
(Edited By : Sachin Waghmare)