

Sangli Municipal Election News: महापालिका निवडणुकीच्या प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवर चिखलफेक सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या गंभीर टीकेनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. जयंत पाटलांना रोखण्यासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी काल शुक्रवारी केली होती. भाजपने अकोट येथे एमआयएम आणि अंबरनाथ येथे काँग्रेस पक्षाशी केलेल्या युतीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी हा टोला लगावला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जयंत पाटील यांची अवस्थाच कीव करण्यासारखी झाली असल्याचे म्हटले आहे.
जयंत पाटलांची अवस्था ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकर यांच्यासारखी झाली आहे. ‘कोणी घर देता घर’, असे ते म्हणत होते. हे जयंत पाटील आता ‘कोणी पक्षात घेता का पक्षात, अशी आर्जवं करीत आहेत.’ जयंतरावांची अवस्था त्यांच्या पक्षात लिंबू-टिंबूसारखी झाली आहे, असा घणाघात चंद्रकांतदादांनी केला आहे.
जयंतराव हे नगरपरिषद निवडणुकीत ते ईश्वरपूर, आष्ट्यातून बाहेर पडले नव्हते. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडीलाही ते गेले नाहीत. राज्याचे नेते, पण त्यांना दोन शहरांत जखडून ठेवले होते. त्यांची स्थिती पक्षात, राज्याच्या राजकारणात लिंबू-टिंबूसारखी झाली आहे. त्यामुळेच ते आता आम्हाला ‘पक्षात घ्या की, पक्षात घ्या की’ अशी दिल्लीदरबारी आर्जव करीत आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महापालिका निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र आले आहेत. ज्या संजय काका आणि विशाल पाटील यांची लोकसभेत कुस्ती झाली तेही या निवडणुकीच्या निमित्ताने गळ्यात गळे घातलेले दिसून येत आहेत असा टोला चंद्रकांतदादांनी यावेळी लगावला. 'शब्दाला शब्द जोडून रामदास आठवले होता येत नाही, असेही ते म्हणाले.
‘भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे. अकोट येथे एमआयएम आणि अंबरनाथ येथे काँग्रेस पक्षाशी भाजपने केलेल्या युतीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी हा टोला लगावला. यावेळी "ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे..." अशी शेरोशायरी करत जयंत पाटील यांनी भाजपाची खिल्ली उडवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.