

Sangli News: सांगली पोलिसांकडून अमली पदार्थांची तस्कर करणाऱ्याचा थरारक पाठलाग करत बेड्या ठोकण्यात आल्या. या तस्कराकडून पोलिसांच्या पथकाच्या तावडीत सापडल्यानंतर वाहनासह गांजा पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर पाठलाग करताना एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला. पोलिसांनी अत्यंत शिताफिने आरोपीला अटक केली.
एलसीबीच्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून गांजा तस्कराला पकडल्यानंतर त्याने गांजासह चक्क मोटार पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पेटवलेला कागद विझल्यामुळे तो डाव फसला. पोलिसांनी तातडीने गांजा तस्कर विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भीमनगर, पिंपळी रस्ता, जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. गुरुवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईत ३३ लाख ५० हजारांचा गांजा, चारचाकी असा ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.विकी कांबळे हा वोटेंड गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.
विकी कांबळे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हरिपूर येथील कुख्यात गुंड विजय ऊर्फ पप्पू बजरंग फाकडे (वय ४२) याने मागवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे फाकडेविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला काल सांगलीत बारामतीहून विना नंबरप्लेटच्या चारचाकीतून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाने कवलापूर येथे सापळा लावला होता.
संबंधित मोटार भरधाव वेगाने येताना पाहून पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. कांबळे याने माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर, रामरहिम कॉलनी या मार्गावर दिसेल तिकडे मोटार सुसाट वेगाने पळवली. तेवढ्यात पोलिसांनी संजयनगर व कुपवाड एमआयडीसी पोलिसांना याची माहिती कळवली. तब्बल ४५ मिनिटे पाठलाग केल्यानंतर जुना जकात नाका कुपवाड चौकात मोटार अडवली.
पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच विकी कांबळे याने गाडी 'रिव्हर्स' घेऊन पोलिस गाडीला धडक दिली. यामध्ये सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे जखमी झाले. अखेर शरणागती पत्करण्यापूर्वी विकी कांबळे याने पेट्रोलची बाटली गाडीत ओतून कागद पेटवला. मात्र कागद वाऱ्याने विझल्यामुळे आग लागली नाही. पोलिसांनी शिताफीने विकीला ताब्यात घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.