Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील एका भाजप कार्यकर्त्याने पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांना एक खुले पत्र लिहले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिल्ह्यात या पत्राची चर्चा रंगली आहे. या पत्रातून भाजप कार्यकर्त्याने थेट गिरीश महाजन यांच्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी राजकीय तडजोड केल्याचा आरोप करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थितीत केले आहे.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांना हे खुलं पत्र लिहलं आहे. आपल्याशी बोलण्याचा सोशल माध्यमांशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आज नाईलाजाने हे पत्र मी फेसबुकवर पोस्ट करत आहे. आज हे पत्र लिहिताना मन थोडं विषण्ण आहे, पण काळजातील कार्यकर्त्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच एक प्रामाणिक हेतू आहे असं हर्षल चौधरी यांनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
या पत्रात पुढे हर्षल चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करुन दिली आहे. भाऊ, आठवतंय का तो काळ? जेव्हा तुम्ही तुमची पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. त्यावेळेस तुमच्या सोबतीला कोणताही मोठा वारसा नव्हता, होते ते फक्त तुमचे खंबीर नेतृत्व, सेवाभावी व्यक्तिमत्व आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार! एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला जेव्हा पक्षाच्या नेतृत्वाने बळ दिलं, तेव्हा आजचे 'नामदार गिरीशभाऊ महाजन' घडले. पण आज मागे वळून पाहताना प्रश्न पडतो की, त्याच सामान्य कार्यकर्त्याची जागा आज कोणाला मिळतेय? आज त्या सामान्य कार्यकर्त्याची जागा तुम्ही भू-माफिया, भांडवलदार, भ्रष्टाचारी आणि पक्ष बदलणाऱ्या 'आया राम गया राम' यांना देत आहात? असा थेट सवाल चौधरी यांनी पत्रातून केला आहे.
हर्षल चौधरी यांनी पुढे लिहलं आहे की, आपल्या प्रत्येक भाषणात आपण अभिमानाने सांगता की, "भारतीय जनता पक्षाच्या केंद्रस्थानी कार्यकर्ता आहे." पण भाऊ, जळगाव जिल्ह्यातील वस्तुस्थिती आज काही वेगळीच भासतेय. महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी नैसर्गिक किंवा राजकीय संकट उभे राहते, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही तत्परतेने हजर असता, हे आम्ही अभिमानाने पाहतो. पण दुर्दैवाने, त्याच वेळी तुमच्या हक्काच्या जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्याला त्याच्या दुःखात व सुखात भेटायला मात्र तुमच्याकडे वेळ नाही, हे पाहून मनाला खूप वेदना होतात.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत तुम्ही अनेक 'आयाराम-गयारामां'ना पक्षाची तिकीटं दिली आणि त्यांना निवडून आणलं. पण त्याच लोकांनी नंतर जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून लावली आणि निष्ठेच्या जीवावर जगणाऱ्या भाजपला विरोधी बाकावर बसवलं. हे तुम्ही कसं विसरलात? अशा विश्वासघाती लोकांना पक्षात स्थान देऊन तुम्ही खऱ्या कार्यकर्त्याचा बळी का देत आहात, हा प्रश्न जळगावमधील सामान्य कार्यकर्त्याला आजही पडतो.
गुलाबरावांशी तडजोड...
हर्षल चौधरी यांनी पुढे लिहिताना मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत राजकीय तडजोड केल्याचा आरोप केला आहे. चौधरी यांनी लिहलं आहे की, जळगाव तालुक्यातील कार्यकर्ते पक्षाचे काम करत असताना आम्हाला वारंवार असे जाणवते की, नामदार गुलाबराव पाटील आणि तुमच्यात एक अघोषित करार झाला आहे. "तुम्ही जामनेरमध्ये शिवसेना वाढवू नका, आम्ही जळगाव ग्रामीणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला बळ देणार नाही," अशा पद्धतीचे हे राजकारण चालले आहे. जर हे खरं असेल, तर मग त्या सामान्य कार्यकर्त्याचा काय दोष ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य पक्षासाठी अर्पण केलं? कार्यकर्त्यांनी बोलावलेल्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक टाळणं, हे एका लोकनेत्याला साजेस आहे का? असा सवाल चौधरी यांनी केला आहे.
अमरीशभाई पटेलांनी शिरपूरमध्ये जलसंधारण आणि शिक्षणाचा जो पॅटर्न राबवला, तसा शाश्वत विकासाचा विचार खानदेशासाठी आपल्याकडून का दिसत नाही? पर्यावरण, रोजगार आणि शेती या विषयांवर आपला ठोस अजेंडा कुठे हरवला आहे? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्रात आपणही इतर नेत्यांप्रमाणे अडकला आहात का, हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व सर्वसामान्यांना पडला आहे.
पत्राचा शेवट करताना भाजप कार्यकर्ते हर्षल चौधरी यांनी गिरीस महाजन यांना उद्देशून म्हटलं आहे की, जगाच्या नजरेत आज तुम्ही अत्यंत यशस्वी असाल, पण ज्या 'संघटने 'ने तुम्हाला घडवलं, तीच 'संघटना' वापरून आजच्या परिस्थितीत एक नवा 'गिरीश महाजन' तयार करण्याची धमक तुमच्यात उरली आहे का? की निव्वळ संधीसाधू आणि पक्षांतर करणाऱ्यांना पक्षात घेऊन आपण कार्यकर्त्यांचा बळी देणार आहात?
भाऊ, हे पत्र टीका म्हणून नाही, तर तुमच्यातील त्या जुन्या 'लोकनेत्याला' साद घालण्यासाठी आहे. सत्तेच्या झगमगाटात कार्यकर्त्याचा अंधार होऊ देऊ नका. आपल्या या राजकीय प्रवासाचे आपण निश्चितच सिंहावलोकन कराल, अशी मला आशा वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.