गो. रा. कुंभार
Solapur, 19 November : मोहोळ मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीचे सूत्रधार ज्येष्ठ नेते शरद पवार असल्याचे मंगळवारी सकाळीच स्पष्ट झाले.
माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्याच पिचवर चारीमुंड्या चीत करण्यासाठी थोरल्या पवारांनी टाकलेला डाव अनेकांच्या लक्षातही आला नाही. मात्र, ‘तुमच्या मनासारखे होईल, बारामतीला भेटायला या’ या एकाच वाक्यावर क्षीरसागरांनी माघार घेतली आणि सकाळीच गोविंद बागेत जाऊन पवारांची भेट घेतली. त्या भेटीत क्षीरसागर यांच्या पदरात महामंडळाचे अध्यक्षपद आणि एक खासगी काम पूर्ण करण्याचा शब्द पडला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात (Mohol Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार यशवंत माने, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजू खरे हे निवडणूक लढवत आहेत. संजय क्षीरसागर हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छूक होते. मात्र, त्यांना तिकिट मिळू शकले नव्हते, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. क्षीरसागर यांची उमेदवारी ही तुतारीच्या विजयात अडथळा ठरू शकते, हे लक्षात घेऊन पक्षातील स्थानिक नेत्यांनी सूत्रे फिरवली.
क्षीरसागर यांनी उमेदवारी मागे घेणे आवश्यक आहे. एव्हाना मतविभागणीची फायदा आमदार यशवंत माने यांना होऊ शकतो, ही गोष्ट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापर्यंत पोचली होती. त्यांनी सूत्रे हाती घेताच वेगवान घडामोडी घडल्या.खुद्द पवारांचा फोन गेला आणि संजय क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्या कुरुल येथील प्रचाराच्या सांगता सभेच्या व्यासपीठावर हजेरी लावली आणि उपस्थितांना धक्का दिला. या सर्व नाट्यमय घडामोडीचे सूत्रधार हे शरद पवार हेच होते, सिद्ध झाले.
दरम्यान, कुरुल येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर पोचलेले संजय क्षीरसागर यांनी भाषणही केले. ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या अमिषाला मी बळी पडलो नाही. निवडणुकीत राजन पाटलांच्या पैशावरही उतरलो नव्हतो. मी माझ्या स्वतःच्या पैशावर निवडणूक लढवत होतो. मला जर पैसेच घ्यायचे असते तर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नसतो, त्यामुळे विरोधकांनी माझा अपप्रचार थांबवावा, असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले.
राजू खरे यांना पाठिंबा देणारे संजय क्षीरसागर यांना सोमवारी संध्याकाळी शरद पवार यांनी भेटीसाठी बारामती येथे बोलावले होते. पण, कुरुल येथील प्रचाराच्या सांगता सभेमुळे रात्री उशीर झाल्याने क्षीरसागर हे शिष्टमंडळासह आज (ता. 19 नोव्हेंबर) सकाळी बारामतीत पवारांच्या भेटीसाठी गेले होते. पवारांनी भेटीसाठी तब्बल 26 मिनिटांचा वेळ दिल्याने क्षीरसागर हे खूश होते.
बारामतीतील भेटीत पवारांनी राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला आहे. महामंडळाचे अध्यक्षपद, साखर कारखान्याशी संबंधित विषयही मार्गी लावण्याचे आश्वासन पवारांनी दिल्याची माहिती आहे. याशिवाय मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचेही आश्वासन पवार यांनी दिले.
या शिष्टमंडळामध्ये सतीश पाटील, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, सोमनाथ व्यवहारे, शैलेश कुंभार, उमेश पवार, धनाजी गायकवाड यांचा समावेश होता. दरम्यान, संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांची थेट भेट घेतल्यामुळे मोहोळमधील नेतेमंडळींमध्ये चलबिचल वाढली आहे. आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतरच बैठकीची सफलता प्रत्यक्षात उतरणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.