Karhad News : राज्यातील कायदा- सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अयशस्वी झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अन् महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुन्हेगारांचे असलेले फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट केले जात असून मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्डची गॅंग चालवत असल्याचा आरोप केला आहे.
या आरोपाला सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना संजय राऊतांना दमच दिला आहे. संजय राऊत कोणत्या पुण्यकर्मासाठी 100 दिवस तुरूंगात जावून आले आहेत. त्यांची अजून निर्दोष मुक्तता झाली नसून ते जामिनावार बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे, असे मंत्री देसाई म्हणालेत.
कराड येथे एका कार्यक्रमासाठी टाऊन हाॅल येथे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत महायुती सरकारवर विशेषतः शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार हल्ला करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले असून पुण्यात निखिल वागळे, असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचाही समाचार घेतला होता. मुख्यमंत्र्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री देसाई यांनी संजय राऊतांना सूचक इशाराच दिला आहे.
संजय राऊत काहीही बोलत असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे मंत्रिमंडळ चोवीस बाय सात काम करत असते. त्यामुळे अशा नाहक, बिनबुडाच्या आरोप करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही.
संजय राऊत 100 दिवस कोणत्या पुण्यकर्मासाठी तुरूंगात होते. त्याचा आधी त्यांनी खुलासा करावा. संजय राऊतांनी एक लक्ष ठेवावे, ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली नाही. तसेच आपण कोणत्या पुण्यकर्मामुळे आत गेला होता, याचे उत्तर द्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यावर टीका करा, असे मंत्री देसाई म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे गुंडांचे सरदार आहेत. ते चोरांची टोळी चालवत आहेत. जे तुरुंगात असायला हवे, ते मुख्यमंत्र्यांसोबत फिरत आहे. ते फेकूचंद आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यांनी करमचंद जासूस म्हटले. परंतु करमचंद जासूस यांनी किती चांगले काम केले आहे, हे त्यांना माहीत नाही. कारण त्यांचा अभ्यास नाही. त्यांचे वाचन नाही. त्यांचा आसपास विचारवंत, बुद्धवंत असायला हवे. परंतु गुंड आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी केला होता.
(Edited By : Sachin Waghmare)