Karad News, 01 Oct : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतरही आपली अंतिम उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचं अतुलबाबांनी स्पष्ट केलं आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर कोणाचे अर्ज कायम ठेवायचे, याचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज दाखल करताना यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उदयसिंह पाटील हे सूचक, तर नामदेव सावंत हे अनुमोदक आहेत.
“महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करतील. चर्चेतून कोणाचे अर्ज ठेवायचे, हे निश्चित होईल. त्यामुळे आज अर्ज जरी भरला असला, तरी अंतिम निर्णय येणाऱ्या काही दिवसांत निश्चित होईल,” असं म्हणत अतुल भोसले यांनी आपली उमेदवारी अंतिम नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी सोसायटी गटातून उदयसिंह पाटील यांचा अर्ज निश्चित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“उदयदादांचा अर्ज सोसायटी गटामधून आम्ही सगळ्यांनी मिळून दाखल केलेला आहे. आजच्या घडीला सोसायटी गटामधून त्यांचा अर्ज निश्चित राहील आणि माझ्या अर्जाचं काय व्हायचं, हे पक्षपातळीवर चर्चा केल्यानंतर ठरेल, असं भोसले म्हणाले.
त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचं आणि अंतिम उमेदवारांचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून, १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे अतुलबाबांचा अर्ज कायम राहणार की महायुतीच्या चर्चेनंतर वेगळा निर्णय होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.