Satara News : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर राहणार असून भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे साताऱ्यात गेली पाच वर्षे भाजपचा खासदार निवडून आणण्याचे भाजपचे प्रयत्नाना अपयश येण्याचे संकेत आहेत.
साताऱ्यात खासदार शरद पवार यांचाच करिष्मा आजही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. आजपर्यंत उदयनराजे भोसले कॉलर उडवत होते, आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) साताऱ्यातून कॉलर उडवणार असे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध संस्थांचे मतदानानंतरचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यामध्ये टिव्ही नाईन, पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती. पण, खासदार उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार असूनही त्यांची अडीच वर्षे बाकी असतानाही त्यांना जनतेतून खासदार व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत भाजपकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपचे सर्वेसर्वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या अंदाजानुसार उदयनराजेंच्या विरोधात वातावरण असल्याने त्यांनी त्यांच्या उमदेवारीबाबत निर्णय घेण्याचे टाळले होते.
भाजपकडून उमेदवारांच्या दहा याद्या जाहीर झाल्यातरी त्यामध्ये उदयनराजेंचे नाव आलेले नव्हते. तरीही उदयनराजेंनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे समजून प्रचाराचा दणका सुरु ठेवला होता. त्याच दरम्यान, खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात चाचपणी करताना खासदार श्रीनिवास पाटलांनी लढण्यास नकार दिल्याने त्यांनी खासदार उदयनराजेंच्या विरोधात खमक्या उमेदवार देण्यासाठी जिल्ह्यातील जनतेचा कानोसा घेतला. त्यांनी अखेर शशिकांत शिंदेंचे नाव निश्चित केले.
उदयनराजे (Udayanraje Bhosale) विरुद्ध शशिकांत शिंदे अशी प्रतिष्ठेची व चुरशीची लढत झाली. यामध्ये शशिकांत शिंदेंसाठी खासदार शरद पवारांनी पाच सभा घेतल्या. तर उदयनराजेंसाठी मोदींची कराडात सभा झाली. तसेच महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही सभा झाल्या. पाटण, वाई, कराडात उदयनराजेंविषयीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अखेरच्या टप्प्यापर्यंत केला होता.
आता Tv9 आणि 'पोलस्ट्राट' एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर राहणार तर उदयनराजे पिछाडीवर राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहेत. खासदार शरद पवार यांचा सातारा बालेकिल्ल्यात करिष्मा कायम असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.