Satara News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. तसेच या नेत्यांकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे. मात्र, अशा प्रकारे मराठा आरक्षणाला विरोध करणे याचा अर्थ ओबीसी नेते मराठा समाजाला ग्राह्य धरत नाहीत का? असा सवाल करत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याना केला आहे. ते शनिवारी साताऱ्यात मराठा आरक्षणाची करणारे मनोज जरांगे यांच्या भेटीप्रसंगी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात जनजागृती दौरा सुरू केला आहे. त्यानिमित्ताने जरांगे पाटील यांची आज मराठ्याची राजधानी सातारा या शहरात आशीर्वाद सभा पार पडली. या प्रसंगी त्यांनी साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसले आणि सुरुची बंगल्यावर जात शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेत जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
मनोज जरांगे पाटील यांनी शिवेंद्रराजेंशी संवाद साधून मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणाच्या नोंदी सापडत असल्याची माहिती दिली. तसेच ओबीसी समाजाकडून जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला खोडा घातला जात असल्याचेही जरांगे म्हणाले. यावर शिवेंद्रराजे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणात नोंदी मिळत असतील, तर कायद्याने मराठा समाजाला आरक्षणा मिळाले पाहिजे. तसेच छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊ नये. आम्ही पण मराठा आहोत. मात्र, आम्ही मराठा मुस्लिस ओबीसी या सर्वांचा विचार करून पुढे जात आहोत. मात्र, ओबीसी नेत्यांकडून मराठा आरक्षणाला विरोध होत आहे. याचा अर्थ ते मराठा समाजाला मानत नाहीत का? असा सवाल त्यांनी या वेळी भुजबळांना केला.
मनोज जरांगे पाटील यांना भुजबळांकडून मराठा आरक्षणाला होत असलेल्या विरोधाबाबत विचारणा केली असता, जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने आता भुजबळांसारख्या नेत्यांना किंमत देऊ नये. गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळणार म्हणून त्यांचा विरोध सुरू झाला आहे. त्यासाठी ते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत आहेत. मात्र, मराठा समाजाने शांततेत आपले आंदोलन सुरू ठेवायचे आहे. प्रत्यक्ष ओबीसी समाजदेखील आपल्या सोबत आहे. त्यामुळे अशा राजकारणी लोकांना किंमत देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी शिवेंद्रराजेंच्या भेटीनंतर मराठा समाज बांधवांना केले आहे.