
Satara ZP Election : एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे; पण भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आम्ही महायुतीच असल्याचे सांगितले जात आहे. ही महायुती कितीही एकसंध असल्याचा दावा केला जात असला, तरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादीतच छुपी लढत पाहायला मिळणार आहे.
गेल्या दोन विधानसभांच्या निवडणुकांपासून जिल्ह्यात राष्ट्रवादीची पीछेहाट सुरू आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात राहिलेला नाही; पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार व एक खासदार अशी ताकद आहे. त्यामुळे यावेळेस जिल्हा परिषदेची ही निवडणूक राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची आहे.
२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 41 सदस्य होते, तर कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाचे सात सदस्य, तर शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकविण्याची तयारी सुरू केली. यंदा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल चार आमदार निवडून आले. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. भाजपची वाढलेली ताकद पाहता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने निवडणुकीत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिण, उत्तर तसेच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा, जावळी, कऱ्हाड उत्तरचा काही भाग, कोरेगावच्या काही भागातील गटात सक्षम उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत, तसेच दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून माण, खटाव व फलटण तालुक्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. मध्यंतरी वाई तालुक्यातील बावधन गटातही लक्ष घातल्याने मंत्री गोरे व मकरंद पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगली होती. दोघांनीही एकमेकांना अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद असलेल्या तालुक्यातील गटातही भाजपकडून हस्तक्षेप होण्याची चिन्हे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गोरेंचे बंधू शेखर गोरेंनी माण, खटाव तालुक्यात स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, हेही औत्सुक्याचे आहे.
फलटणला संघर्षधार तीव्र
फलटण तालुक्यात माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या घरातील संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर हे दोन उमेदवार यावेळेसही जिल्हा परिषदेच्या रिंगणात असतील, तसेच इतर चार गट राखीव झाल्याने तेथे राजे गटाकडून उमेदवार दिले जातील. त्यांच्या विरोधात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून उमेदवार दिले जाणार आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्षाच्या गटाला ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून कऱ्हाड दक्षिणचे उदयसिंह पाटील उंडाळकर, माणचे अनिल देसाई, पाटणचे विक्रमबाबा पाटणकर, साताऱ्याचे संदीप चव्हाण, फलटणचे भीमराव बुरुंगले, रामभाऊ ढेपे, महानंदचे अध्यक्ष डी. के. पवार आदींना पक्षात घेऊन तालुकानिहाय ताकद वाढविली आहे. आगामी काळात आणखी काही प्रवेश होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही निवडणूक भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षांची संघटनशक्ती वाढवण्याला साथ देणारी ठरत आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडीपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातच छुप्या पद्धतीने होण्याची शक्यता अधिक आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार जिल्ह्यात असून, त्यापैकी शंभूराज देसाई हे कॅबिनेट व पालकमंत्री आहेत. त्यांचे तीन जिल्हाप्रमुख असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाची बांधणी केली आहे; पण एकनाथ शिंदेंची भूमिका महायुतीसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याची आहे. साताऱ्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत; पण पाटण, कोरेगावात शिवसेनेच्या विचारांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील. इतर तालुक्यात त्यांना किती उमेदवार मिळणार? हेही महत्त्वाचे असेल. त्यासाठी त्यांना भाजप व राष्ट्रवादीची साथ मिळणार का? याची उत्सुकता राहणार आहे.
दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची फारशी ताकद नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेससोबत आघाडी करून लढणेच त्यांना अस्तित्व टिकविण्याचा दृष्टीने सोयीचे होणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी दिल्याने या लढवय्या नेत्यालाही आपले कसब पणाला लावावे लागणार आहे, तर काँग्रेसला सावरण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसचे सात सदस्य निवडून आले होते. आता हे सात सदस्य टिकविण्यासोबतच यामध्ये भर घालण्यासाठी काँग्रेसला आघाडीतील महत्त्वपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल (गतवेळचे)
एकूण गट - ६४
राष्ट्रवादी - ४१
काँग्रेस - ७
भाजप - ७
शिवसेना - २
सातारा विकास आघाडी - ३
कऱ्हाड विकास आघाडी - ३
पाटण विकास आघाडी - १
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.