

Kolhapur, 04 September : शक्तिपीठ महामार्ग समर्थन आणि विरोध यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात जुंपली आहे. ‘स्वाभिमानी’ कडून सुरू आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. त्यानंतर पेटलेल्या वादावर आमदार सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांच्या वक्तव्याची हवाच काढून टाकली आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री व्हायची घाई झाली आहे. कधी एकदा आबिटकर यांना बाजूला काढून मी मंत्री होतोय; म्हणून सरकारची बाजू परखडपणे मांडत आहेत. क्षीरसागर यांना शक्तिपीठमध्ये पडायची गरज नव्हती, हा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या आमदारांना म्हणजे आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि कोरे यांना तुमच्या बाजूने बोलायला लावा आणि मग तुम्ही शक्तिपीठची बाजू घ्या, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांना सुनावले.
राजू शेट्टी हे राज्याचे नेते आहेत, क्षीरसागर यांना विनंती आहे. राज्याच्या नेतृत्वावर बोलताना त्याची रिएक्शन येणारच. शक्तिपीठ हिताचा कसा वाटतोय आणि राज्याची वाट कशी लागते, हे तुम्ही लोकांना सांगा. या प्रकल्पातून काय नुकसान होणार आहे. हे सांगा म्हणजे लोक काय तो निर्णय घेतील, कारण नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. हे आमचं म्हणणं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द करण्याची भूमिका घेतली, ती खरी की खोटी, निवडणुकीच्या आधी घोषणा केली, ती मतं घेण्यासाठी केली. लाडक्या बहिणींची योजना तुम्ही आणली, मतं मिळाली आणि आता बहिणींना तुम्ही बाजूला केलं. सरकारमधल्या प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांसमोर मी कसा चांगला वाटेल, मुख्यमंत्र्यांना बरं वाटेल, असं बोलायचं हे सुरू आहे, असा टोलाही आमदार क्षीरसागर यांना सतेज पाटील यांनी लगावला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, हे मी सातत्याने सांगतोय. या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. पुण्यात बापट यांना जी मारहाण झाली, ती राज्याच्या दृष्टीने निषेध करण्यासारखी आहे, अशा गोष्टी होत गेल्या तर उद्या कोणीही कुणालाही काहीही करेल, अशी अवस्था आहे. राज्यातल्या जनतेला वाटले पाहिजे की, आम्ही सुरक्षित आहोत, त्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा, अशी आमची मागणी असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताळ फासण्याचं काम सरकारने केलं आहे. नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने आला तेव्हा मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळून त्यांना फसवण्यात आलं अशी भावना मराठा समाजाची आहे. मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढण्याचे काम केलं, परंतु सरकार या विषयाचा खेळखंडोबा करत आहे, शिष्टमंडळात माणसं बदलली जातात, दरवेळी वेगळे शिष्टमंडळ चर्चेला जातं. हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची नाही, यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काय झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल.
महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आला आहे, दररोज उठून डेअऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे. महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. दूध उत्पादक एकमुखी आमच्या बाजूने राहतील, अशी मला खात्री आहे, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.