Kolhapur News, 05 Dec : 2005 ते 2014 पर्यंत कारखानदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र मागील दहा वर्षांपासून कधी युती तर कधी महाविकास आघाडीशी जुळवून घेत असताना लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शेट्टी एकाकी पडले.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लोकसभा लढवावी यासाठी अनेक दिग्गजानी त्यांना पायघड्या घातल्या. मात्र त्याला नकार देत शेट्टी यांनी एकला चलोचा नारा दिला. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील भूमिका एक असल्याने नगरपालिका निवडणुकीत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टी यांनी सतेज पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहे.
आज पार पडणाऱ्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे शेट्टी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांची जोडी जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना तोंड देण्यासाठी आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत येऊन महायुतीच्या विरोधात लढण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठेवण्यात आला होता. मात्र शेट्टी यांनी हा प्रस्ताव धूडकावून लावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीशी मैत्री करण्याचा डाव संघटनेला मारक ठरू शकतो अशी भूमिका शेट्टी यांना वाटले असावी.
त्यामुळे त्यांनी देखील स्वतंत्र निवडणूक लढवली. हीच भूमिका विधानसभा निवडणुकीत राहिली. मात्र मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारचा खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील एकत्र लढाई देताना दिसले.
त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसचे सूत जुळले आहे. जे राजू शेट्टी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणातून उतरलेले दिसले तेच शेट्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत असणार आहेत. जयसिंगपूर नगरपालिकेत सह, कुरुंदवाड शिरोळ मध्ये देखील काँग्रेस सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना राहिली. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना ही काँग्रेसमध्ये राहण्याचे संकेत आहेत.
त्याचे कारण ही तसेच आहे. आज कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे सतेज कृषी प्रदर्शनाची उद्घाटन होणार आहे. दरवेळी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या उद्घाटनाचे निमंत्रण दिले जाते. मात्र आमदार सतेज पाटील यांनी यंदा हे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी राजकारणाचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.