पाटण : शिवसेना पक्षाने त्यांना भरभरून दिले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः येऊन लाल दिवा दिला. शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद दिले. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून हे महाशय बंडात सहभागी झाले, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर नाव न घेता केला.
पाटण तालुक्यातील गुजरवाडी- म्हावशी येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘गेली सात- आठ वर्षे आपल्याकडे आमदारकी नसली, तरी मी घरात बसून किंवा पाटण तालुका सोडून बाहेर जाऊन मुक्काम ठोकलेला नाही. पराभवाने खचून न जाता ग्रामपंचायती, नगरपंचायतीपासून अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सत्ता खेचून आणल्या.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील तळागाळातील लोकांसाठी विकासकामे आणली. डोंगराळ भागातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे आणली.
मात्र, आमच्या विरोधकांना हे आवडलं नाही. त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले, अजितदादा आमच्या विरोधकांना जास्त विकासकामे, जास्त निधी देतात. वास्तविक महाविकास आघाडी सरकारमुळे पाटण तालुक्यातील जनतेचा चारही बाजूंनी चौफेर विकास व्हायला पाहिजे होता; पण तसं घडलं नाही.
विरोधकांच्या माध्यमातून का होईना आपल्याच मतदारसंघाचा विकास होतोय, जनतेच्या समस्या सुटत आहेत, हे पाहून आमच्या मंत्री महोदयांनी खूष व्हायला पाहिजे होते; पण नेमकं याच्या उलट मंत्री वागत होते. बंडाच्या कटकारस्थानामुळे उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा मला वाईट वाटले. मग निष्ठावंत शिवसैनिकांची काय अवस्था झाली असेल, असा प्रश्न करून ते म्हणाले, खोके देणाऱ्यांच्या मागे हा 'सत्यजित' कधीही जाणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.