सातारा : नुकत्याच झालेल्या पाटण तालुक्यातील 90 पैकी तब्बल 46 विकास सेवा सोसायटींवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर 11 सोसायटयांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी सत्तांतर करत ताब्यात घेतल्या आहेत. हा विजय आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीचा असून येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूका लागतील. या निवडणूकीत शिवसेनेचा सभापती झाला पाहिजे. तसेच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील नव्वद सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात झाला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, मोरणा शिक्षण संस्था अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयवंतराव शेलार,डॉ. दिलीप चव्हाण, अशोकराव पाटील, अॅड. डी पी.जाधव, विजय पवार, बबनराव शिंदे, भरत साळुंखे, अभिजीत पाटील, प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात गत वर्षभरात पार पडलेल्या सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकांत लोकांनी गटासाठी, पक्षासाठी तळमळीने काम केले. हा विजय आपला नसून सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. पक्ष तळागळात कसा पोहचेल याचा विचार सर्व कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. 21 वर्ष संघर्ष आपण संघर्ष केला. तेव्हा कुठे 2004 मध्ये आमदारकी मिळाली. तालुक्यातील अनेक गावं, अनेक घरं, अनेक कुटूंब यांचा आमच्या चौथ्या पिढीसोबत ऋणानुबंद आहेत. चार पिढ्याचं नातं आम्ही तालुक्यातील सामान्य जनतेशी जोडलेले आहे.
सामान्य जनतेसाठी जे जे हवे ते ते आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. समोर पराभव दिसत असताना ही आम्ही जिद्दीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत लढलो. पण पराभव झाला पण आता देसाई गट चांगलाचं चार्ज झाला आहे. तळागळातील कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागले आहेत. सोसायटींच्या निवडणूकांतून तालुक्याला ते दिसलेचं आहे. येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूका लागतील. या निवडणूकीत पाटण पंचायतीवर शिवसेना पक्षाचा फडकविण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागवे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पाटण तालुक्यातील गारवडे, बेलवडे, बनपुरी, जिंती, गुढे, कडवे बु, खोणोली,लेंढोरी, सळवे, गुंजाळी, महिंद, भैरवदेव मालदन, धामणी, कुठरे, साईगडे, भारसाखळे, निवडे, वजरोशी, मरळोशी, बांबवडे, आडूळ पेठ, आवर्डे, मुरूड, मालोशी, चाफळ, नानेगाव बुद्रुक, मंद्रुळ हवेली, जाळगेवाडी, नावडी, सोनाईचीवाडी, मुळगाव, आंब्रुळे, आडदेव, हनुमान आडुळ, नाडे, चोपडी, मरळी, सोनवडे, सांगवड, पापर्डे, मारुल हवेली, मोरेवाडी, कुंभारगाव, खळे, काढणे, गलमेवाडी या सोसायट्यांमध्ये पूर्णता सत्ता संपादन केलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सणबूर, शिरळ, घाणव, ढोरोशी, सुरुल, धायटी/पाडळोशी, नाणेगाव खु, विहे, त्रिपुडी, मालदन, उमरकांचन, मेंढ, मोरगिरी, शेंडेंवाडी या सेवा सोसायटयांमध्ये अंशता निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार झाला. कार्यक्रमास विविध गावांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंग नलावडे यांनी आभार मानले.
कार्यकर्ता जिद्दीला पेटला की....
प्रयत्न केले की अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही हे अलीकडे झालेल्या विकास सेवा सोसायटींच्या निवडणूकीत शिवसेना व देसाई गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. देसाई गटाचा कार्यकर्ता जिद्दीला पेटला की तो काय करु शकतो हे आपण पाहिले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीच्या पराभवातून आपण शिकलो. आपला सामान्य कार्यकर्ता कसा बदल घडवू शकतो हे आपण या सोसायटींच्या निवडणूकीत पहात आहोत, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.