Barshi, 08 November : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा अपमान करायचा घाट ज्यांनी घातला, त्यांची व्याजासकट परतफेड करण्याची वेळ आली आहे. असा सुफडा साफ झाला पाहिजे की, मनोज जरांगेंवर पुन्हा कोणाची बोलायची हिम्मत झाली नाही पाहिजे, अशा शब्दांत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाव न घेता आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार आमराजे यांनी आमदार राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, बार्शीतील गुंडगिरी, झुंडशाही, हुकूमशाही जर अशीच चालू राहिली, तर श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजनसुद्धा तुम्हाला मागून घ्यावा लागलं. तेव्हा बार्शीकरांनी फार विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही निंबाळकरांनी केले.
रावणाची सोन्याची लंका राहिली नाही आणि आपण किस झाड की पत्ती आहात, असा टोला आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच नाव न घेता निंबाळकर यांनी लगावला. ते म्हणाले, परमेश्वराने आपल्याला सगळं दिल असेल तर त्याचा माज कशामुळे करायचा, नम्रतेने आणि प्रामाणिकपणे राहावं.
मीही गुंडागर्दीच्या विरोधात संघर्ष केलेला आहे आणि तसली गुंडागर्दी गाढूनच मी इथंपर्यंत आलेलो आहे, त्यामुळे बार्शीतील जनता येणाऱ्या 23 तारखेला ही गुंडगिरी, झुंडशाही, हुकूमशाहीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, मी बार्शीच्या आमदारांचा अनुभव घेतला आहे. लोकसभेला फार संयम ठेवला. कारण, मी संबंध जपणारा माणूस आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना बार्शीच्या विद्यमान आमदारांना विरोधी पक्षाचे आहेत, असं कधीही जाणवू दिलं नाही. नेहमी 'हम साथ साथ हैं', 'हम दिल दे चुके सनम' अशी भावना ठेवली. कारण आपलं मन साफ आणि सरळ आहे. मात्र सरकार बदललं आणि 'हम साथ साथ हैं','हम दिल दे चुके सनम' असं मी ज्यांना म्हणत होतो त्यांनी मला 'हम आपके हैं कोन' म्हणायला सुरुवात केली. कशी झक मारायची आता..?
समोरचा आमदार निवडून आणून तुम्हाला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे का..? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा अपमान करायचा घाट ज्यांनी घातला, त्यांची व्याजासकट परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे सांगून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शीत मागील दोन महिन्यांत घडलेल्या घडामोडीवरून जनतेला आवाहन केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा चोरलेला बाण घेऊन समोर कोण आला आहे, तुम्ही बघा, असे सांगून त्यांनी शिवसेना फुटीवर भाष्य केले.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.