Solapur, 08 November : मोहोळच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माघार घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांनी विरोधकांकडून आपल्या जीवितास धोका असून पोलिस संरक्षण मिळावे, असे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे, त्यामुळे मोहोळच्या मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी पोलिस संरक्षण मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. विरोधकांकडून आपल्या जीवितास धोका आहे, त्यामुळे पोलिस संरक्षण मिळावे, अशा मागणीचे पत्र कदम यांनी पोलिसांना दिले आहे. मात्र कदम यांना कोणत्या विरोधकांकडून धोका आहे, हे स्पष्ट केलेले नाही.
मोहोळ (Mohol) येथील दोघांना दोन दिवसांपूर्वी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण अटकेच्या आधी माजी आमदार रमेश कदम यांच्या कार्यालयात आला होता, असा आरोप रमेश कदम यांनी केलेला आहे.
कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, मला आणि माझ्या मुलीला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी रागातून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्याचा राग धरून एका व्यक्तीने माझ्या संपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरली आहे.
तुम्ही त्याला (महायुतीचे उमेदवार यशवंत माने) कशाला पठिंबा दिलाय, तो काय तुम्हाला पैसे देणार आहे का, अशी धमकीवजा भाषा वापरत बोलू लागला. त्यानंतर तो संपर्क कार्यालयातून बाहेर जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे आढळून आल्याचे समजले.
ती व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरून माझ्या जिवाला धोका पोचविण्यासाठी आला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, माझ्या कार्यकर्त्यांनाही धमकी वजा फोन येत असून त्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या निवडणुकीतील घडामोडी पाहता माझ्या विरोधकांकडून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे मला तातडीने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी मोहोळचे रमेश कदम यांनी पत्रातून केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.