Solapur, 25 October : भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश असून तीन आमदारांना अजूनही भाजपने ‘वेटिंग’वर ठेवले आहे. यात बार्शी मतदारसंघाचा समावेश असून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आहेत. आगामी निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपने अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही.
एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे अर्ज भरून रिकामे झाले आहेत. त्यामुळे आमदार राऊतांची उमेदवारी नेमकी कुठे आणि का अडली, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
मागील निवडणूक राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी अपक्ष लढत भाजपच्या पाठिंब्यावर जिंकली होती. या वेळी मात्र भाजपकडून निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. विद्यमान आमदार आणि भाजपकडून प्रबळ दावेदार नसल्यामुळे राऊत यांचे नाव पहिल्या यादीत येणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळू शकलेले नाही.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही बार्शी मतदारसंघावर (Barshi Constituency) दावा करण्यात आला आहे. या पेचात राऊत यांची उमेदवारी अडकली आहे. मागील निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजेंद्र राऊत असा सामना रंगला होता. तिरंगी लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.
आता राऊत हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, शिवसेनेच्या दाव्यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. मात्र, आगामी यादीत राऊतांचे नाव असेल असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
शिवसेना भाजप युतीमध्ये मागील २०१९ च्या निवडणुकीत बार्शी, करमाळा, सोलापूर शहर मध्य, सांगोला, मोहोळ या पाच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यातील केवळ सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजी पाटील निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बार्शीवर दावा करण्यात येत आहे.
दुसरीकडे, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपकडे आले आहेत, त्यामुळे महायुतीच्या धर्माप्रमाणे बार्शीवर भाजपचा दावा नैसर्गिक आहे. मात्र, शिवसेनाही बार्शीवरचा दावा सोडायला तयार नसल्याने राजेंद्र राऊत यांंची उमेदवारी लटकली आहे. भाजपकडून मात्र ही जागा कोणत्याही परिस्थितीत कमळाच्या चिन्हावर लढवली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
आमदार राजेंद्र राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, राजेंद्र राऊत यांची ती तयारी आहे का आणि भाजप आपल्या हक्काच्या जागेवर सहजासहजी पाणी सोडेल का, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून प्रचारालाही लागले आहेत, त्यामुळे राऊतांच्या उमेदवारीचे काय, अशी विचारणा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.