गोंदवले : मुलांना शिक्षित करून उच्च पदस्थ अधिकारी वा उद्योगपती करता आले नाही, तर माझ्या पक्षात पाठवा मी त्यांना मंत्री करतो, असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
माजी मंत्री महादेव जानकर एका कार्यक्रमासाठी दहिवडीत आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब जगदाळे, सुवर्णा देसाई, अरुण गोरे, पंचायत समितीच्या सभापती लतिका वीरकर, उपसभापती नितीन राजगे, माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पोराने शेतकरीच का बनावं? असा सवाल करून श्री. जानकर म्हणाले, शेतकऱ्याच्या पोरानं पंतप्रधान,उद्योगपती आणि राज्यकर्ते सुद्धा बनावं. जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कलेक्टर हे दोन्हीही आपलेच असतील तर दोन्ही चाके व्यवस्थित चालतील. क्लार्क नको कलेक्टर पाहिजे, पोलिस नको कमिशनर पाहिजे आणि सरपंच नको खासदार पाहिजे यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.
इंजिनिअरिंग मध्ये मी ९५ टक्के गुण मिळवून भारतात तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यामुळे राजकारणात आलो नसतो तर कमिशनर म्हणून या कार्यक्रमात आलो असतो, असे सांगून ते म्हणाले, राजकारण फार वाईट आहे, असा समज निर्माण झाला आहे. परंतु राजकारण वाईट असतं तर पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलगी देशाच्या पंतप्रधान झाल्या नसत्या.
देशाचे व राज्याचे नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार झाल्या नसत्या. तसेच कै. गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही उच्च शिक्षित मुली खासदार व मंत्री झाल्या नसत्या. म्हणून राजकारणात सुद्धा संधी आहे. त्यामध्ये करिअर करा. मोठ्या उद्योगपतींना कुणी सॅल्युट करत नाही पण, राजकारण्यांना सॅल्युट केला जातो. ही राजकारणाची ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.