Kolhapur News: विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भाजपला देखील घाटगे यांची मदत होऊ शकते, शिवाय विरोधात भूमिका घेणे हे देखील घाटगे यांना राजकीय दृष्ट्या परवडणारे नसल्याने गेले अनेक दिवस त्यांची पुन्हा घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वरिष्ठ स्तरावरून त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्याची देखील चर्चा आहे. मात्र घाटगे हे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर घाटगे यांनी त्यांची भेट घेत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या भेटीमुळे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भेटीनंतर काही काळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होते.
गडकरी यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नवीन राजवाडा या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी देखील घाटगे हे गडकरी यांच्यासोबत होते. दरम्यान घाटगे यांनी, पुणे-बंगळूर महामार्गाचे काम समाधानकारक होत असून मोठी रहदारी असणाऱ्या कागलमध्ये पिलर पूल तयार करावा, अशी मागणी घाटगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्याबाबतची निवेदन देखील देण्यात आले आहे.
पुणे -बंगळूर महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. कागल ते सातारा मार्गाचे कामही पूर्णत्वास जात असताना समाधान वाटते. हे काम पूर्णत्वास जात असताना नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा तसेच पत्रव्यवहार करत भूमिका मांडली होती.
कागल शहर हे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वसलेले एक महत्त्वपूर्ण शहर असून, नागरिकांना विविध कारणांस्तव रस्ता ओलांडावा लागतो. शहरात न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, शाळा, कारखाने, दवाखाने, औद्योगिक वसाहत असून, या सर्वांचा विचार करता पिलरचा पूल ही काळाची गरज आहे. हा पूल झाल्यानंतर वाहतुकीचा मोठा अडथळा दूर होणार आहे. दरम्यान, मांगूर फाट्याप्रमाणे कागलमध्येही चांगला पुल होईल, असा शब्द दिला गडकरी यांनी दिला असल्याचेही घाटगे यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.