
Kolhapur/Sangli News : राज्यातील शेतकऱ्यांच्या माथ्यावर महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्ग थोपला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने याला गती देण्यात आली आहे. पण आता याच महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील कागलसह सांगलीतील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. कागलच्या शेतकऱ्यांनी थेट कागल तहसीलवर मोर्चा काढला. तर सांगलीच्या शेतकऱ्यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत सवाल केला आहे. सध्या सांगलीकरांच्या पत्रव्यवहाराची चर्चा सुरू आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात विरोध वाढत आहे. कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाचा तीव्र विरोध करताना तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी माजी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती अंबरिश घाटगे, ठाकरे गटाचे विजय देवणे उपस्थित होते.
यावेळी हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून याला विरोध शेतकरी करत आहेत. हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा असून शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. मात्र या सरकारला ते ऐकू जात नाही. या महामार्गामुळे इरिगेशन स्कीम, कूपनलिका, विहिरी, छोटे उद्योग यांचे नुकसान होणार असून जे भरून निघणारे नाही. यामुळे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे आणि तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमीका घाटगेंनी घेतली आहे. तर हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारून थट्टा करण्याचे पाप सरकारने केल्याची टीका यावेळी अंबरिश घाटगे यांनी केली असून या महामार्गा ऐवजी अंबाबाई व तुळजाभवानी मंदिरांचा कायापालट करण्यासाठी सरकारने निधी द्यावा, यातून रोजगार निर्मिती, अशी मागणी केली आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यात देखील या महामार्गाला मोठा विरोध होत असून आधी रद्द करू अशी घोषणा केली होती. ही घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मग आता काय झालं? राज्यात महायुतीचे सरकार आले आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच या महामार्गाची अधिकच गरज का भासू लागली आहे. या महामार्गामुळे शेतजमिणी, वन जमिणी नष्ट होणार असल्याने तो काय कामाचा? असावा आता शेतकरी करत आहेत.
तसेच शेतकऱ्यांच्या मुळावर हा महामार्ग उठणारा असून शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यामुळे तो काही कामाचा नाही, असेही शेतकऱ्यांचे मत आहे. तर या महामार्गाच्या आराखड्यात तो अनेक मंदिरांना जोडताना दिसत नाही. यामुळे जर मंदिरेच जोडली जाणार नसतील तर मग शक्तिपीठ महामार्ग कसला असही सवाल आता सांगलीतील कवलापूर येथील शेतकऱ्यांनी सवाल केला आहे. कवलापूर येथील शेतकऱ्यांनी याबाबत थेट राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे याबाबत विचारणा केली आहे.
कवलापूर येथील संभाजी दिनकर सावंत यांची जमीन या महामार्गात जाणार असून त्यांनी याबाबत हरकत घेतली होती. याबाबत त्यांनी पत्रव्यवहार केला होता. तर याच मुद्द्यावरून त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संशय व्यक्त केला होता. तर हा महामार्ग अनेक मंदिरापासून कोसो दूरून जात असल्याचे पुरावे आणि फोटो पाठवले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.