
Solapur, 11 April : ज्येष्ठ नेते शरद पवार हे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची लाट असतानाही सोलापूर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाठराखण करत तब्बल चार आमदार निवडून दिले होते. विधानसभा निवडणुकीत मोठे यश पदरात टाकत सोलापूरकरांनी पवारांवरील आपले प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले होते. मात्र, राज्यभरात पडझड झाल्याने महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहिली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ‘टॉनिक’ ठरण्याची शक्यता आहे.
(स्व.) चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या (ता. १२ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे सोलापूर राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. या उत्साहीत झालेल्या कार्यकर्त्यांना पवार कशा पद्धताने कामाला लावणार, हेही पाहावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीचे घोडदौड सुरू असताना सोलापुरात मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सोलापूरकरांनी मुक्त हस्ते मतदानाची उधळण केली होती, त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षाला दहा जागा मिळालेल्या असताना त्यातील चार जागा ह्या एकट्या सोलापुरात निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे सोलापूरकरांचे (Solapur) पवारांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते.
विधानसभेतील यशानंतर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काहींसा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहराचे नेतृत्व करणारे महेश कोठे यांचा कुंभमेळ्यात दुर्दैवी मृत्यू झाला. कोठे यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून सोलापूर शहर राष्ट्रवादी अद्याप सावरलेली दिसत नाही. कोठे यांच्या तोडीचा नेता अजून पक्षाला मिळालेला नाही.
सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या पक्षाला कोठे यांच्या दुर्दैवी अंतामुळे मोठा धक्का बसला आहे. आता तेवढ्या तोलामोलाचे नेतृत्व पक्षाकडे नसल्यामुळे पक्षाला महापालिका निवडणुकीत मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेकांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. त्याला सत्ता हेही कारण असू शकते. कारण, पक्षाकडे जनमाणसातील नेता म्हणजेच मास लिडर नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. आता शहरातील उर्वरीत पदाधिकाऱ्यांना पवार कशा पद्धतीने कामाला लावतात, हे पाहावे लागणार आहे.
शरद पवार हे चंद्राम गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी येत असले तरी त्यांचा सोलापुरात मुक्काम असणार आहे. बालाजी सरोवर येथे पवारांचा मुक्काम असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सोलापूरमधील राजकीय घडामोडींचे केंद्र असणार आहे. या राखीव वेळेत पवार कोणा कोणाला भेटणार आणि काय काय खेळ्या करणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.