

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे नाराज असल्याच्या चर्चा त्यांच्या मुलाच्या व्हायरल पोस्टमुळे अधिक जोरात सुरू झाल्या आहेत.
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरडे
यांच्यापुढे भाजप किंवा शिंदे गटात जाण्याचा पर्याय आहे.
बरडे यांच्या मुलाच्या पोस्टमध्ये महापालिकेची इमारत दिसत असल्याने ते निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून उद्धव ठाकरे गटाचा फोटो व चिन्ह पोस्टमधून गायब आहे.
Solapur, 04 December : शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केलेले शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांच्या मुलाने केलेल्या पोस्टमुळे बरडे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार, याची उत्सुकता आहे. मात्र, बरडे यांच्या चिरंजीवाची पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे.
पुरुषोत्तम बरडे यांनी शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या सोलापूर (Solapur) जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. याशिवाय सोलापूरसंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर तो बरडे यांना वगळून कधीही होत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बरडे हे शिवसेनेत साईडला गेल्याचे जाणवत होते.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाल्यानंतरही बरडे हे शिवसेना जिल्हाप्रमुख होते. मात्र, पुढे ते शिवसेनेत बाजूला फेकले गेले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंसोबत काम केले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना उद्धव ठाकरे यांनी सहसंपर्कप्रमुख नेमले होते. मात्र, जिल्हाप्रमुखपद गेल्याने ते नाराज होते. पण त्यांनी आपली नाराजी कधीही बोलून दाखवली नव्हती.
बरडे हे नाराज असले तरी त्याबाबत त्यांनी कधीही जाहीर वाच्यता केलेली नव्हती. मात्र, त्यांचे चिंरजीव समर्थ बरडे यांच्या पोस्टमुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबड उडाली आहे. त्यात बरडे यांनी म्हटले आहे की, ‘खेळ सांगून खेळायचा पत्ता शेवटी उघडायचो असतो. नियोजन आधी दाखवायचं नसतं. वेळ आल्यावर गाजवायचं असतं.’
विशेष म्हणजे या पोस्टमध्ये बरडे यांच्या फोटोमागे सोलापूर महापालिकेची ‘इंद्रधनू ’ ही इमारतही दाखवण्यात आली आहे. त्यामुळे बरडे हे महाालिका निवडणूक लढविणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या पोस्टमध्ये बरडे यांचे छायचित्र असले तरी उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि मशाल चिन्हही गायब आहे, त्यामुळे बरडे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
→ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सध्या सहसंपर्कप्रमुख, बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते.
→ त्यांच्या मुलाच्या व्हायरल पोस्टमधून पक्षावरील असंतोषाचे संकेत मिळाले.
→ भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय आहे.
→ व्हायरल पोस्टमधील महापालिकेच्या इमारतीच्या पार्श्वभूमीमुळे निवडणूक लढवण्याचे संकेत दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.