
Karad, 01 August : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर डागडुजी सुरू केली आहे. परवा काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी आणि काही जिल्ह्यांचे अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर पक्षाने आज युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड जाहीर केली आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने पदाचे वाटप करताना विभागावर संतुलन राखल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड येथील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले युवा नेते शिवराज मोरे (Shivraj More) यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार पक्षात फेरबदल करण्यात येत आहेत. त्यानुसार दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या हस्ते शिवराज मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू उपस्थित होते.
शिवराज मोरे यांनी काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम करताना आपली छाप सोडली आहे. मोरे यांची विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दोन वेळा निवड झाली होती. तसेच, युवक काँग्रेसचे (Youth Congress) सरचिटणीस आणि उपाध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदही शिवराज यांनी सांभाळले आहे. निवडणुकीच्या कामासाठी पक्षाने त्यांना अनेक ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मोरे यांनी आपल्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यांचे विविध पदांवरील काम पाहून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शिवराज मोरे यांच्यावर प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शिवराज मोरे यांच्याकडे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देऊन पक्षाने प्रादेशिक समतोल राखला आहे. विधीमंडळातील पक्षनेतेपद हे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे, तर प्रदेशाध्यक्षपद हे मराठवाड्यातील हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे देण्यात आले आहे. आता मोरे यांना युवक अध्यक्षपदाच्या माध्यमातून आपली चमक दाखविण्याची संधी मिळाली आहे.
या नियुक्तीनंतर शिवराज मोरे म्हणाले, काँग्रेस आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. पक्षाने मला प्रदेश पातळीवरील मोठ्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्याचे माझे काम असणार आहे. युवक काँग्रेस राज्यात अधिक बळकट करण्यासाठी राज्यभर दौरे करणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम मी करणार आहे.
देशात काँग्रेस पक्ष सर्वात अनुभवी राजकीय पक्ष आहे. सध्या पक्षासाठी संघर्षाचा कालावधी आहे. पण त्याही परिस्थिती प्रत्येक गावांत काँग्रेसचे कार्य पोचविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्या माध्यमातून युवक काँग्रेसची पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असेही शिवराज मोरे यांनी स्पष्ट केले.
‘एनएसयूआय’च्या अध्यक्षपदी सागर साळुंखे
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साळुंखे हे गेल्या काही वर्षांपासून ‘एनएसयूआय’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.