कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) तर उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे यांची बिनविरोध निवड झाली. मुश्रीफ यांना आमदार विनय कोरे (Vinay Kore) सूचक तर आमदार पी. एन. पाटील अनुमोदक होते. आवळे यांना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर सूचक तर विजयसिंह माने अनुमोदक होते. दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांनी दोघांच्या निवडीची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हा बॅंकेतच मुश्रीफ व आवळे यांच्या नावांचा जयघोष करत जल्लोष केला.
निवडणुकीदरम्यान अध्यक्षपद करवीर तालुक्याला मिळावे, अशी मागणी होती. यामुळे अध्यक्षपद मुश्रीफ की पी. एन. यांना मिळणार, याची उत्सुकता होती. यातच आमदार विनय कोरे यांनी सत्तारूढ गटाच्या पॅनेलमधील उमेदवारांच्या घरातीलही मते सत्तारूढ पॅनेलला मिळाली नसल्याने काही उमेदवार पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली होती. अध्यक्ष निवडीत आपल्याला गृहीत धरू नये, असाही इशारा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष निवड चर्चेचा विषय ठरला होता.
शासकीय विश्रामगृहातील दीर्घ चर्चेनंतर अध्यक्षपदासाठी मुश्रीफ तर उपाध्यक्षपदासाठी आवळे यांचे नाव सर्वानुमते निश्चित झाले. त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आवळे, पी.एन., कोरे यांच्यासह इतर सर्व संचालक जिल्हा बॅंकेच्या शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयात आले. यावेळी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच हलगी वाजवून स्वागत केले. कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांचा जयघोष केल्यामुळे बॅंक परिसर दणाणून गेला.
जिल्हा बॅंकेच्या कार्यालयात एकीकडे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना बॅंकेतच अध्यक्षांच्या दालनासमोर हलगी वाजवून कार्यकर्त्यांनी ठेका धरला. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही संचालकांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी दिली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्वच संचालकांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गराडा घातला. सायंकाळी पाच पर्यंत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू राहिला.
अध्यक्षपदाची हट्ट्रीक
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बँकेच्या अध्यक्षपदावर तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. प्रशासक नियुक्तीपूर्वी ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीनंतर सलग सहा वर्षे अध्यक्ष राहिले. आज तिसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. आवळे यांनाही उपाध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे.
एकच वाघ...
एकीकडे मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तर दुसरीकडे आमदार पी. एन. यांच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वाघ’ अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या. त्यानंतर कागल आणि करवीरमधील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या घोषणा देवून वातावरण हसत-खेळत ठेवले.
बॅंकेचा कारभारही चांगला करावा
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील सर्व विरोध विसरून सत्तारूढ आणि विरोधी शिवसेना प्रणित पॅनेलमधून विजयी झालेले सर्व संचालक एकत्र बसूनच एकमेकांशी चर्चा करत होते. यावरून बॅंकेचा कारभारही चांगला करावा, अशी भूमिका बाहेर उभे असणाऱ्या कार्यकर्त्यांमधून होत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.