Mahabaleshwar Crime News : व्हेल मासा उलटी तस्करी; महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह चौघे वन विभागाच्या ताब्यात

Whale Vomit व्हेल माशाच्या उलटीची किंमत करोड रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Whale Vomit
Whale Vomitsarkarnama
Published on
Updated on

Mahabaleshwar Crime News : महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकांसह चार जणांना सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. काल मध्यरात्री वन विभागाने ही कारवाई केली असून, सर्व संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तब्बल साडेसहा किलोग्रॅम व्हेल माशाची उलटी, वजनकाटा व एक वाहन जप्त करण्यात आले आहे. या उलटीची किंमत करोडो रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

महाबळेश्वर Mahabaleshwar वन विभागाने Forest Department सोमवारी सायंकाळी धाडसी कारवाई करत मेढा महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर वन परिक्षेत्रातील माचुतर येथे व्हेल माशाच्या उलटीची बेकायदेशीर विक्री करताना माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह संतोष खुशालचंद्र जैन (रा. निसर्ग विहार, रत्नागिरी, जि. रत्नागिरी), संजय जयराम सुर्वे (रा. मेढा, ता. जावळी), अनिल अर्जुन ओंबळे (रा. बोंडारवाडी, ता. जावळी) यांना ताब्यात घेतले आहे.

वन विभागास दिल्ली येथून खबऱ्याकडून दोन तीन दिवस आधी व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी लोक येणार असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात वन विभागाने आपल्या स्थानिक खबऱ्यांना सतर्क केले होते. सोमवारी सकाळी एसटी बसने रत्नागिरी येथून एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी घेऊन महाबळेश्वर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

या व्यक्तीने स्थानिकास संपर्क साधला असता, एका वाहनात चौघे जण हे महाबळेश्वर - मेढा रस्त्यावरून निघाले असताना आधीच वन विभागाने सापळा रचून माचुतर गावाच्या हद्दीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाची उलटी जप्त केली.

तसेच वापरण्यात आलेले एक वाहन व वजनकाटादेखील ताब्यात घेतला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या कार्यालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या चौघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या या चौघांना आज वाई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या कारवाईमध्ये महाबळेश्वर सातारा व मेढा वन विभागाने सहभाग घेतला. उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पदभार स्वीकारलेले वनक्षेत्रपाल गणेश उत्तमराव महांगडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Whale Vomit
Satara Loksabha News : भाजपचे मिशन सातारा लोकसभा; केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष...

व्हेल माशाची उलटी एवढी महाग का...?

एका किलोग्रॅम व्हेल माशाच्या उलटीची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रीय भाषेत ॲम्बरग्रीस म्हणतात. अ‍ॅम्बरग्रीसला समुद्राचा खजिना असेही म्हटले जाते. व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचं अन्न खाताे. काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचे अन्न पचत नाही, तेव्हा तो उलटी करतो, त्यालाच ॲम्बरग्रीस म्हटलं जातं. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेल उलटी चिकट बनते. उलटीचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. परफ्यूम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात.

Edited By Umesh Bambare

Whale Vomit
Mumbai Mathadi News : माथाडी कायद्याला बदनाम करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार : देवेंद्र फडणवीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com