Solapur Lok Sabha Constituency : पत्रकार ते राज्यसभा सदस्य; अमर साबळे यांचे नाव सोलापुरातून चर्चेत

Amar Sable News : साबळे यांनी पक्षासाठी दिलेले योगदान आणि भाजपच्या राजकारणातील दलित चेहरा म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Amar Sabale
Amar Sabalesarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांकडून सोयीच्या मतदारसंघातून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यातच बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट केला जाण्याचे संकेत भाजपकडून आधीच देण्यात आले आहेत. त्यामुळेच भाजपकडून आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने 2024 महाविजय संकल्प अभियानाचे समन्वयक म्हणून अमर साबळे यांच्याकडे जबाबदारी सोपवत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे साबळे हेच आगामी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मूळचे बारामतीचे असलेले आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले अमर साबळे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. बारामतीत राहून शरद पवारांना वैचारिक विरोध करत साबळे यांनी आपली राजकीय कारकीर्द उज्ज्वल केली आहे. भाजपच्या राजकारणात मागासवर्गीय चेहरा असलेल्या साबळे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 2015 मध्ये दिग्गजांची नावे डावलून भाजपच्या वरिष्ठांनी अमर साबळे यांना राज्यसभा सदस्यत्वाची उमेदवारी जाहीर केली होती. साबळे यांच्यासाठी ही एक प्रकारची लॉटरीच समजली जात होती. राज्यसभा सदस्य म्हणून साबळे यांनी दमदार कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यसभेत व्हीप म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Amar Sabale
Solapur LokSabha Constituency : मठाधिपती ते खासदार; राजकारणासाठी अध्यात्माची वाट बदलणारे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी!

दरम्यान, आतादेखील भाजपने साबळे यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. साबळे यांचे पक्षासाठी दिलेले योगदान आणि भाजपच्या राजकारणातील दलित चेहरा म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या मतदारसंघात यापूर्वी दोन वेळा मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत उमेदवार निवडून दिले आहेत. मात्र, दोन्ही उमेदवारांकडून मतदारांच्या पदरी निराशाच पदरी पडली आहे. त्यातच आता अमर साबळे हे केंद्रीय नेतृत्वाशी जवळीकता साधून असलेले उमेदवार समजले जात आहेत. त्यांनी मतदारसंघात गाठीभेठी घेत आपली तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, सोलापूर मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांची मुलगी प्रणिती शिंदे या इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रणिती शिंदे या तीन टर्म शहर मध्यमधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यादेखील उच्चशिक्षित असून मतदारसंघात त्यांच्या आक्रमकपणाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळे भाजपकडूनही त्या तोडीचा अभ्यासू उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामध्ये अमर साबळे यांचे नाव सध्या चर्चेत येत आहे.

Amar Sabale
Solapur Politics : विजयदादाही उतरले मैदानात; माढ्याचा दौरा करीत घेतल्या गाठीभेटी...

नाव (Name)

अमर शंकर साबळे

जन्मतारीख (Birth date)

07/02/1963

शिक्षण (Education)

बीए, डिप्लोमा - पत्रकारिता

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे हे मूळचे बारामतीचे आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव शंकर साबळे, तर आईचे नाव अनुसया साबळे आहे. अमर साबळे यांच्या पत्नीचे नाव भारती साबळे आहे. साबळे यांना मुलगा आणि दोन मुली आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अमर साबळे व्यवसायाने पत्रकार आणि एक राजकारणी आहेत. अमर साबळे यांनी 17 मार्च 2015 रोजी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

पत्रकार आणि राजकारण

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

सोलापूर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

अमर साबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले राजकारणी आहेत. पत्रकारितेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे साबळे हे ओबीसीनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून राजकारणात सक्रिय झाले.भाजपच्या विचारसरणीचा पगडा असलेल्या साबळेंनी शरद पवारांच्या विरोधात वैचारिक लढा उभा केला. बारामतीत राहून त्यांनी भाजपचा विस्तार करण्यासाठी काम केले. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी पंढरपूर, बीड आदी मतदारसंघांत निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले. दरम्यान, 2009 मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पुढे 2014 मध्येही ते इच्छुक असताना भाजपने वाटाघाटीमध्ये ती जागा आरपीआयला दिली. त्यामुळे साबळे नाराज होते. मात्र, 2015 मध्ये अचानक भाजपच्या वरिष्ठांनी साबळे यांची राज्यसभेवर वर्णी लावली. त्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांना तोंडात बोटे घालावी लागली होती.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी अमर साबळे यांना राजकारणात पाठिंबा दिला होता. दरम्यान,राज्यसभेत साबळे यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवल्याने तिथेही त्यांना विविध समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली. पक्षाने त्यांची राज्यसभेत व्हीप म्हणून नियुक्ती केली. भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारणाऱ्या साबळेंनी 2019 मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केली होती. मात्र, साबळे यांनी स्वत:च तो दावा खोडून काढला होता, पण जर पक्षाने सांगितले सोलापूरच काय बारामतीमधूनही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगत आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली होती.

आतादेखील भाजपने 2024 च्या महाविजय संकल्पाचे सोलापूर आणि माढा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून साबळे यांची नियुक्ती केली आहे. भाजपकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. मात्र साबळे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

अमर साबळे हे एक धडाडीचे पत्रकार आणि झुंजार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आग्रही आणि प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना पत्रकार म्हणून त्यांनी केकावली या साप्ताहिकातून, तसेच लोकसत्ता, पुढारी, दैनिक अजिंक्य या वतर्मानपत्रातून मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना साबळे यांनी दलित, मागासवर्गीयांचे प्रश्न सभागृहात लावून धरले होते.

Amar Sabale
Karmala Politics : पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंना व्हायचंय आमदार; करमाळ्यातून रणशिंग फुंकले

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

2019 च्या निवडणुकीवेळीच अमर साबळे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यावेळीदेखील त्यांच्यावर पक्षाने या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्यांनी सोलापूर मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता. तसेच अमर साबळे यांनी मागासवर्गीय मोर्चाचे प्रमुख, यासह राज्यसभा खासदार म्हणून काम करीत असताना सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि काही सामाजिक संघटनांशी संपर्क वाढवला होता. मात्र, ते मूळचे बारामतीचे आणि वास्तव्याला पिंपरी-चिंचवड येथे असल्यामुळे सोलापूर मतदारसंघात त्यांचा म्हणावा तितका जनसंपर्क वाढलेला नाही.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

अमर साबळे हे सोशल मीडियावर सक्रिय असून राजकारणात आणि समाजात घडणाऱ्या घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होताना दिसून येतात. त्यासोबत भाजपची ध्येयधोरणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, विकासकामांची माहिती ते शेअर करीत राहतात. त्यासोबत साबळे हे एक पत्रकार आणि वक्ते आहेत. त्यामुळे ते त्यांचे विचार सोशल मीडियातून प्रभावीपणे मांडतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

अमर साबळे हे एक अभ्यासू राजकारणी आणि विचारवंत वक्ते आहेत. त्यामुळे ते कोणतेही राजकीय विधान करताना फारसे आक्रमक होत नाहीत. असे असतानाही त्यांनी मध्यंतरीच्या काळात भगव्या राष्ट्रध्वजासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकर अनुकूल होते, असे मत व्यक्त करत वादाला तोंड फोडले होते. तसेच साबळे यांनी आंबेडकरी संघटनांना नक्षलवाद्यांची उपमा दिल्यानेदेखील वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रात जेव्हा मराठेतर मुख्यमंत्री झाला की शरद पवार यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने ते मुख्यमंत्रिपदावर असावे ही कल्पनाच पवार सहन करू शकत नसल्याची टीका त्यांनी शरद पवारांवर केली होती. त्यावरून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

अमर साबळे हे एक पत्रकार आणि वक्ते आहेत. त्यामुळे वंचितांचे प्रश्न ते तळमळीने मांडतात. याशिवाय त्यांनी भाजपमध्ये मागासवर्गीय आघाडीचे नेतृत्व केले आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. अमर साबळे यांचे पक्षातील कार्य पाहूनच पक्षनेतृत्वाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वाची भेट दिली होती. दिग्गजांना डावलून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. ती त्यांच्या कार्याची पोचपावती होती. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा विश्वास हा त्यांच्यासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाजू मानली जाते. पक्ष संघटनेत काम करत असताना कार्यकर्ते जोडण्याचे कसब, विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

अमर साबळे हे उच्चशिक्षित, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार असले तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा म्हणावा तितका जनसंपर्क नाही. सोलापूर मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भाग मिळून विस्तारलेला आहे. मात्र साबळे हे पिंपरी या ठिकाणी वास्तव्यास असून सोलापूर मतदारसंघात त्यांचा वावर नाही. निवडणुका आल्या की ते या मतदारसंघात दिसून येतात. केवळ पक्ष संघटनेच्या जबाबदारीवर ते या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी चाचपणी करताना दिसून येतात. मात्र येथील लोकप्रतिनिधींकडून स्थानिक उमेदवाराचा आग्रह करत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जाऊ शकतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

अमर साबळे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत. भाजपने अद्यापही या ठिकाणी आपला उमेदवार कोण असेल याबाबतचे पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, साबळे यांच्यावर या मतदारसंघाच्या समन्वयाची जबाबदारी सोपवत त्यांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. त्यातच रामदास आठवले यांनी सोलापूर मतदारसंघाची मागणी केल्यानंतर सोलापूर हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याची प्रतिक्रिया साबळे यांनी दिली होती. सोलापूरमध्ये डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा सिद्धेश्वरस्वामी हे भाजपचे (bjp) खासदार आहेत. तेथून यापूर्वीही त्यांचाच उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने भाजप हा आरपीआयला देण्याची सूतराम शक्यता नाही. कारण तेथील सहापैकी चार आमदार हे भाजपचे, एक अजित पवार राष्ट्रवादीचा आणि एक काँग्रेसचा आहे. त्यामुळे तेथून भाजपच लढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे गणित साबळे यांनी मांडले होते. त्यामुळे आपली सोलापूरची तयारी सुरू असल्याचे त्यांनी एक प्रकारे स्पष्टच केले.

दरम्यान, साबळे यांची सोलापूरमधून निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. त्यातूनही पक्षाने त्यांना या ठिकाणी संधी नाही दिल्यास. अमर साबळे हे पक्षाने दिलेली समन्वयकाची जबाबदारी चोखपणे पार पाडतील. कारण, मी भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे, माझी राज्यसभेवर वर्णी अनपेक्षितपणे लागली होती. त्यामुळे पक्षाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. त्यामुळे मी संघटनेच्या आदेशाशी कटिबद्ध आहे. त्यातूनही पक्षाने सांगितले तरच मी निवडणूक लढवणार, असे मत त्यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. दरम्यान, या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी भाजप आपल्या धक्कातंत्राचा वापर करत आयत्यावेळी कोणाला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Amar Sabale
Sushilkumar Shinde: उज्वलाताई शिंदेंचा पराभव अन् सुशीलकुमार शिंदेंच्या राजकारणाला घरघर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com