

Solapur, 27 August (अप्पासाहेब हत्ताळे ) : जिल्हाध्यक्षपदाची निवड होऊन तब्बल सव्वा वर्षे (15 महिने) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पूर्व जिल्ह्याची कोअर कमिटी जाहीर झाली आहे. या कमिटीमध्ये 11 सदस्य असून आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रभारी आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. निवडणुका संपलेल्या असल्यामुळे आता पक्षांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने ही कमिटी महत्वपूर्ण मानली जाते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी ही कमिटी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, विकास वाघमारे आणि संतोष मोगले या पदाधिकाऱ्यांचाही कमिटीत समावेश आहे.
आमदार म्हणून सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि समाधान आवताडे यांना स्थान देण्यात आले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय समतोल राखताना आमदार आवताडे यांच्यासोबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाही कोअर कमिटीमध्ये घेण्यात आलेले आहे. तसेच, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना कमिटीत स्थान देऊन त्यांचाही सन्मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची पक्षातील महत्त्वाच्या राजकीय आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये सल्लागार तसेच समन्वयाची भूमिका असते. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीनंतर तातडीने कोअर कमिटीची घोषणा होणे अपेक्षित असते.
मात्र, शशिकांत चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी मे २०२५ मध्ये निवड झाल्यानंतर तब्बल १५ महिन्यांनी ही कमिटी जाहीर झाली. त्यातही जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यास नोव्हेंबरपर्यंत विलंब झाला होता, त्यामुळे संघटनात्मक पातळीवरील या विलंबाची पक्षांतर्गत चर्चा होती.
दरम्यानच्या काळात सोलापूर बाजार समितीसह नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांतील निर्णयप्रक्रिया आणि उमेदवारी देताना आपल्या समर्थकांना डावलले जात असल्याची नाराजी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही, याचीही दक्षता घेतल्याची चर्चा होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यातही जागावाटपावरून कुरबुरी झाल्या होत्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील महत्त्वाची राजकीय व संघटनात्मक निर्णयप्रक्रिया प्रामुख्याने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यापुरती मर्यादित असल्याची पक्षांतर्गत चर्चा होती.
आता या निवडणुका संपल्यानंतर आणि पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत तातडीची मोठी निवडणूक नसताना कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षातील विविध गटांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या कमिटीवर राहणार आहे.
‘पश्चिम’ची कमिटी यादी प्रदेशकडे...
सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नुकतीच गणेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जिल्ह्याची कोअर कमिटी अद्याप जाहीर झालेली नाही. कमिटीची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली असून, त्यात काही फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.