Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर होल्ड ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता महत्वाची ठरते. बँकेच्या माध्यमातून गावातील सोसायटीचा सचिव संचालकांच्या दिमतीला येतो, त्यामुळे गाव पातळीवरील अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारणावर ‘डीसीसी’च्या माध्यमातून वचक ठेवता येतो. (Solapur kedar election for the first time after 52 years)
सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ 2018मध्ये बरखास्त झाले. जिल्ह्याच्या राजकारणात 2019 मध्ये प्रचंड उलथापालथ झाली. या सर्व बदलात जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पॉवर कोणाची आहे? हे सांगणारी एकही मोठी (जिल्हाव्यापी) निवडणूक झाली नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या कोणाची चलती आहे?, दादांची, मामांची की मालकांची? याचे उत्तर मिळालेच नाही.
सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या (केडर) निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सोलापूर देखरेख सहकारी संस्था (केडर) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आतापर्यंत समजल्या जात होत्या. बँकेचे संचालक मंडळ हेच केडरचे पदसिद्ध संचालक मंडळ असल्याची प्रथा 1971 पासून (स्थापनेपासून) होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रशासकाच्या काळात केडरच्या पोटनियमात दुरुस्ती केल्याने आता बँकेसाठी स्वतंत्र संचालक मंडळ व केडरसाठी स्वतंत्र संचालक मंडळ असणार आहे. त्यामुळे तब्बल 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्हा देखरेख संघाची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँक व जिल्हा देखरेख संघाचे सभासद एकच (विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था) असल्याने केडरच्या निवडणुकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले जात आहे.
जिल्हा देखरेख संघ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या काळात 2017 मध्ये बरखास्त करण्यात आला. त्यानंतर मे 2018 मध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले. बँकेवर 2018 पासून आतापर्यंत प्रशासक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी काही सोसायट्या न्यायालयात गेल्या आहेत. मात्र, त्याआगोदरच देखरेख संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक कधी होणार, हे कोणीही सांगू शकत नाही. त्या अगोदरच देखरेख संघाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. देखरेख संघाच्या निवडणुकीकडे जिल्हा बँकेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव घेण्याची प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 200 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये सुरू झाली आहे. ठरावासाठी 1 नोव्हेंबर 2023 ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या तारखेच्या तीन वर्षे मागे ज्या संस्था ठराव घेण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यांच्याकडून सध्या ठराव घेतले जाणार आहे. देखरेख संघासाठी आता 16 स्वतंत्र संचालक असणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे?, कोणाचे किती संचालक निवडणून येतील ? याचा अंदाज या निवडणुकीतून येणार आहे.
...अन् केडरच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला
भाजप सरकारच्या काळात बरखास्त करण्यात आलेल्या देखरेख संघावर प्रथम प्रशासक आणि नंतर अवसायकाची नियुक्त करण्यात आला होता. देखरेख संघाचे अस्तित्व अवसायकाच्या माध्यमातून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. सचिवांवर नियंत्रण, सचिवांची सेवा, वेतन या प्रमुख बाबींसाठी काम करणारा देखरेख संघ टिकला पाहिजे, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने ‘तुम्ही चार आठवड्यात निर्णय घ्या,’ असा आदेश जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांना दिला होता.
देखरेख संघ जिवंत ठेवण्याचा निर्णय उपनिबंधक गायकवाड यांनी घेतला. यामुळे केडरच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देखरेख संघाची येत्या सहा महिन्यांत निवडणूक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.