BJP News : विजयकुमार देशमुखांना सभापती निवडीत झुकते माप; सुभाषबापू अन्‌ देवेंद्र कोठेंना प्रत्येकी दोन समित्या

Solapur Corportion Committee Sabhapati : सोलापूर महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. आमदार विजयकुमार देशमुख गटाला तीन, तर सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे गटाला प्रत्येकी दोन समित्यांचे सभापतिपद मिळाले.
Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh-Devendra Kothe
Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh-Devendra KotheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 July (प्रमिला चोरगी) : भारतीय जनता पक्षाचे बहुमत असलेल्या सोलापूर महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी शुक्रवारी बिनविरोध झाल्या. विषय समित्यांच्या सभापती निवडीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाला झुकते माप देताना तीन समित्यांचे सभापतिपद मिळाले आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटाला प्रत्येकी दोन समित्या मिळाल्या आहेत. प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपकडून प्रत्येक सभापतिपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निर्मला जंगम, श्रद्धा पवार, सुनील खटके, स्वाती बडगू, राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे आणि विजया चिप्पा यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.

सर्वाधिक महत्वाच्या असलेल्या स्थापत्य समिती सभापतिपदी विजया चिप्पा, विधी समिती सभापतिपदी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतिपदी सुनील खटके, शहर सुधारणा समिती सभापतिपदी स्वाती बडगू, मंडई व उद्यान समिती सभापतिपदी राजशेखर पाटील, कामगार व समाजकल्याण समिती सभापतिपदी श्रद्धा पवार तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी निर्मला जंगम यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुख्य समित्या कोठे गटाकडे

सात विषय समित्यांपैकी स्थापत्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती या महत्त्वाच्या मानल्या जातात. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद आमदार देवेंद्र कोठे यांच्या मर्जीतील कार्यकर्त्याला, तर सर्वाधिक महत्वाची असलेली स्थापत्य समितीच्या सभापतिपदी कोठे यांनी आपल्या पाहुण्याची वर्णी लावली आहे.

Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh-Devendra Kothe
BJP corporator : भाजप नगरसेवकाचा चक्री गेम मटका चालू...पोलिस आयुक्त लक्ष द्या : तरुणाची सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

विजयकुमार देशमुखांच्या मतदारसंघातील तिघांची वर्णी

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटातील श्रद्धा पवार यांना कामगार व समाजकल्याण समिती, स्वाती बडगू यांना शहर सुधारणा समिती, तर सुनील खटके यांना वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे.

दक्षिणमध्ये एकाच प्रभागातील दोघांना संधी

आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाकडे दोन सभापतिपदे आली आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही सभापतिदे प्रभाग क्रमांक २३ मधील नगरसेवकांकडे देण्यात आले आहे. त्यात राजशेखर पाटील यांना मंडई व उद्यान समिती, तर सत्यजित वाघमोडे यांना विधी समितीच्या सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे.

Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh-Devendra Kothe
33 Crore Tree Plantation : सुधीर मुनगंटीवारांच्या महत्वकांक्षी योजनेच्या सोलापुरातील कामांचा सीबीआय करणार तपास!

सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे तब्बल ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, विषय समिती सभापती निवडणुकीच्या वेळी ठराविक सदस्यांची उपस्थिती असणे बंधनकारक असते. पण आज सभापतिपदी निवडीच्या वेळी भाजपचेच नगरसेवक अनुपस्थित होते, त्यामुळे निवडी करताना प्रशासन आणि भाजपच्या नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com