Solapur Election 2024 : सोलापूरकरांचा कौल कुणाला? 2019 ची पुनरावृत्ती की महाआघाडी लोकसभेप्रमाणे बाजी मारणार ?

Solapur elections 2019 repeat or Maha Agadhi victory ? : मागील 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी सात जागा जिंकल्या होत्या. आता मात्र या निवडणुकीत दोलायमान परिस्थिती असून त्याला अनेक कारणेही आहेत. त्याची चुणूकही लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती.
Assembly Election
Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 November : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल देणारा सोलापूर जिल्हा उद्या कोणाच्या पारड्यात आपले मतरूपी दान टाकणार, याची उत्सुकता शिगेली पोचली आहे. मागील निवडणुकीत युतीने जिल्ह्यातील 11 पैकी सात जागा जिंकल्या होत्या. आता त्यांच्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आल्याने महायुती झाली आहे, त्यामुळे महायुती ही 2019 चे पुनरावृती करणार की लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीची बाजी मारणार, याचे औत्सुक्य असणार आहे.

मागील 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी सात जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस या पाच जागा जिंकल्या होत्या, तर सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील निवडून आले होते.

बार्शी मतदारसंघात भाजपच्या पाठिंब्यावर राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडून आले होते, त्यामुळे मागील 2019 च्या निवडणुकीत सोलापूरने भाजपच्या पारड्यात भरभरून दान टाकले होते. आता मात्र या निवडणुकीत दोलायमान परिस्थिती असून त्याला अनेक कारणेही आहेत. त्याची चुणूकही लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांतून महाविकास आघाडीने यश मिळवले होते, त्यामध्ये सोलापुरातून प्रणिती शिंदे, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आले होते. विशेष म्हणजे मागच्या 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार निवडून आलेले होते. मात्र त्या यशाची पुनरावृत्ती भाजपला लोकसभेत करता आली नव्हती, त्यामुळे विधानसभेत काय होणार, याची उत्सुकता आहे.

Assembly Election
Jayant Patil : इस्लामपुरात कोणत्या पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला...

लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये पडझड झाली. मागील पाच वर्षे भाजपसोबत असलेले मोहिते पाटील, करमाळ्याचे नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले. त्याचा फटका भाजपला लोकसभेत झाला. याशिवाय जरांगे फॅक्टर, कांदा निर्यातबंदी, सोयाबीनचा बाजारभाव कळीचे मुद्दे ठरले होते. याशिवाय पक्षफोडीचा रागही भाजपवर निघाला. सोयाबीन भावाचा मुद्दाही विधानसभा निवडणुकीतही महायुतीला तोट्याचा ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने, माढ्याचे बबनराव शिंदे, करमाळ्याचे संजयमामा शिंदे हे महायुतीच्या बाजूने होते. त्यानंतरही लोकसभेला महायुतीला अपेक्षित असा निकाल लागू शकला नव्हता. आताही परिस्थिती कायम आहे.

लोकसभा निवडणुकीतील वातावरणाची तीव्रता कमी झाली आहे. त्याला राज्य सरकारने राबविलेल्या योजना कारणीभूत ठरल्या आहेत. यात लाडकी बहिण योजना, महिलांसाठी एसटीचे अर्धे तिकिट, शेतीपंपाच्या विजबिलाची माफी, वयोश्री योजनांचा समावेश आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील खिळखिळतपणाही महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा अजूनही राग कायम आहे. तसेच, सोयाबीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी आहे. पक्ष फोडाफोडीला अजूनही भाजपला कारणीभूत धरले जाते, त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती व्यक्त होऊ शकते. एकंदरीतच भाजप आणि महायुतीला ही निवडणूक सोपी असणार नाही.

Assembly Election
Solapur Politic's : ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंनी दाखवला 'कात्रज'चा घाट; काँग्रेस कार्यकर्ते अपक्षाच्या मदतीला!

अशा आहेत विद्यमान लढती

अक्कलकोट - सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)-आमदार सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (भाजप)-धर्मराज काडादी (अपक्ष)-अमर पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे (भाजप)-फारूक शाब्दी (एमआयएम)- चेतन नरोटे (काँग्रेस)-नरसय्या आडम मास्तर (माकप)

सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)- महेश कोठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)-शोभा बनशेट्टी (अपक्ष)

मोहोळ - यशवंत माने (राष्ट्रवादी)- राजू खरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

माढा - अभिजीत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)-मीनल साठे (राष्ट्रवादी)- रणजितसिंह शिंदे (अपक्ष)

करमाळा - नारायण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)-संजय शिंदे (अपक्ष)-दिग्विजय बागल (भाजप)

पंढरपूर - भगीरथ भालके (काँग्रेस)-अनिल सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)- समाधान आवताडे (भाजप)

बार्शी - राजेंद्र राऊत (शिवसेना)- दिलीप सोपल (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

माळशिरस - राम सातपुते (भाजप)- उत्तम जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सांगोला - दीपक साळुंखे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)-शहाजी पाटील (शिवसेना)-बाबासाहेब देशमुख (शेकाप)

मागील 2019 च्या निवडणुकीतील पक्षनिहाय संख्याबळ

भाजप - 05

राष्ट्रवादी काँग्रेस - 03

शिवसेना - 01

अपक्ष - 02 (एक भाजप समर्थक, एक राष्ट्रवादी समर्थक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com