
Solapur, 15 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केली. कल्याणशेट्टी यांच्या या निर्णायवर भाजपचे वरिष्ठ आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच संतापले आहेत. काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? भाजपच्या कोअर कमिटीत मी आहे की नाही? काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कोणालाही मान्य नाही. मी कल्याणशेट्टींचा पालक आहे, असं मी तर मानतो, ते मानतात की नाही हे मला माहिती नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती देशमुख यांनी स्वपक्षाच्या नेत्यावर केली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याची घोषणा सोमवारी केली आहे. त्यावरून आमदार सुभाष देशमुख यांनी आगपाखड केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप-काँग्रेस नेत्यांच्या पॅनेल विरोधात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत (Solapur Bazar samiti Election) काँग्रेससोबत युती करण्याच्या निर्णयामुळे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्यांवर संतापले आहेत. ते म्हणाले,‘मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या आहेत. त्यात सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते. पण, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय, त्याबाबत मला माहिती नाही, कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला कोअर कमिटीच्या बैठकीला का बोलावले नाही. मी कोअर कमिटीत आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण, ज्या अर्थी मला बोलावलं नाही, त्या अर्थी की कोअर कमिटीत नसेल’
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष युती कोणालाही मान्य नाही. पण पार्टीने जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना अधिकार दिले असतील, तर मला त्याबाबत माहिती नाही. भाजप स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले होते. त्यात प्रत्येक स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांसाठी झटावे, नेत्यांच्या निवडणुका आता संपल्या आहेत, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असे सांगितले हेाते, त्यामुळे प्रदेशाक्षांचा आदेश मानत मी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणार आहे, असे सुभाष देशमुख यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर काँग्रेस सोबत जायला सांगितले असेल आणि तसा निरोप त्यांनी जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिला असेल तर मी तो स्वीकारेन. जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी मला सोबत येण्याचे आवाहन केल्याचे मी केवळ बातम्याद्वारेचं पाहिले त्यांनी मला कळवलेलं नाही, असा टोलाही सुभाष देशमुखांनी कल्याणशेट्टींना लगावला.
कल्याणशेट्टी यांनी सोबत येण्याचे आवाहन माध्यमांद्वारे करू नये. मी त्यांचा पालक आहे, असं मी तरी मानतो. पण, ते मला पालक मानतात की नाही? हे मला माहिती नाही. मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही. मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे, असे सांगून भाजप आमदार सुभाष देशमुख यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनेल असेल, असे स्पष्ट केले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.